सोलापूर : शहराला पाणी पुरवठा करणारी टाकळी ते सोरेगाव लाईनवर नांदणी परिसरात दोन ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊ लागली आहे. तसेच सोरेगाव येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील वॉल्वही नादूरूस्त झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे.
पाईपलाईनला लागलेली गळती दुरुस्त करण्यासाठी टाकळी येथील पंप बंद ठेवावे लागणार आहेत. गळती दुरुस्तीचे काम सोलापूर महापालिकेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी 20 ते 22 तासांचा वेळ लागणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे काम करताना टाकळी- सोरेगावदरम्यानची मुख्य पाईपलाईन बंद ठेवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी (ता. 5) शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
शहर व हद्दवाढ भागातील पाणी पुरवठा उशीराने व कमी वेळ केला जाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने या कालावधीत संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एकवेळ (एक रोटेशन) पुढे जाणार आहे. तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने केले आहे.