पुणे : जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवत मारहाण करीत पाच लाखांची खंडणी घेण्यात आली. याप्रकरणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जळगावमधील २९ जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित प्रकरणात महाजन यांची भूमिका तपासणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
संस्थेचे राजीनामे देण्यासाठी हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. गिरीश महाजन, तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. विजय पाटील (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. विजय हे वकिल असून जळगाव मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेचे संचालक आहेत. जानेवारी २०१८ पासून अॅड. पाटील आणि गिरीश महाजनांसह या सर्वांसोबत वादविवाद सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी या सर्वांनी संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने अॅड. पाटील यांना पुण्यात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करून जबरदस्तीने मोटारीत बसवून सदाशिव पेठेतील एका फ्लॅटवर नेले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याठिकाणी आरोपींनी त्यांचे हात-पाय बांधून डांबून ठेवले. त्यांना मारहाण करत पोटाला चाकू लावला. अॅड. पाटील यांच्यासोबत असलेल्यांना आरोपींनी डांबून ठेवले. त्यानंतर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आरोपींनी त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी घेतली.
त्यानंतर आरोपींनी जळगाव येथे जाऊन त्यांच्या संस्थेत शिरून तोडफोड केली. त्यांच्या खिश्यातील पैसे आणि सोन्याचे दागिने लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त चव्हाण करीत आहेत.
* गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
राजकीय आकसातून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा बोलविता धनी कोण ? हे सर्वांना माहिती असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. गिरीश महाजन यांनी आरोपांचा साफ इन्कार केला आहे. याप्रसंगी आ. महाजन म्हणाले की, तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तीन वर्षांमध्ये अॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो. या घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी स्वत: उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा गुन्हा कुठे घडला? कधी घडला? ज्यांना मारहाण करण्यात आली ते लोक त्यावेळी कुठे होते? त्यांचे फोन ट्रॅक करा, अशी मागणी मी कोर्टाकडे केली आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेल.