नवी दिल्ली : लोकसेवा आयोगाच्या परीक्षा म्हणजे फक्त आणि फक्त हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या यशाची गाथा असते. त्यामुळे, गरीब घराण्यातील मुलेही आयएएस अधिकारी झाल्याची कित्येक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या अंजली बिर्ला यांनीही कष्ट आणि चिकाटीतून आयएएस पदाला गवसणी घातली आहे.
वडिल देशाच्या लोकसभेचे सभापती असतानाही लेकीनं वडिलांचं नाव अभिमानाने आणि गौरवाने मोठं केलंय. आपली मुलं आपल्यापेक्षा मोठी आणि कर्तृत्ववान व्हावीत, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. मग, तो टपरीत चहा विकणार चहावाला असो किंवा देशाच्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळणारे ओम बिर्ला. त्यामुळेच, ओम बिर्ला यांच्या घरी सध्या उत्सवाचे वातावरण आहे. कारण, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अंजली ओम बिर्ला यांनी यश मिळवले आहे.
सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. युपीएससी परीक्षांच्या निकालात अंजली यांचे नाव झळकताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सभापती ओम बिर्ला आणि त्यांची कन्या अंजली बिर्ला यांचं अभिनंदन केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोटा येथील सोफिया महाविद्यालयात आर्ट शाखेतून अंजली यांनी आपले शिक्षण घेतले. त्यानंतर, दिल्लीतील रामजस महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात ऑनर्स पदवी घेतली. त्यानंतर, दिल्लीतच त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले असून मोठी बहिणी आकांक्षा यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, आई डॉ. अमित बिर्ला आणि वडिल ओम बिर्ला यांनीही स्वत:वर विश्वास ठेवून तयारी करण्यास बळ दिल्याचेही अंजली यांनी म्हटलंय.
कोटा येथे शक्यतो बायोलॉजी आणि गणित या विषयांना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे येथील विद्यार्थी याच विषयासाठी प्रवेश घेतात. मात्र, या दोन विषयांपलिकडेही खूप मोठे शिक्षण, समाज, जगदुनिया आहे. त्यामुळेच, परीक्षार्थींनीही हाही विचार करायला हवा, असेही अंजली यांनी सांगितलं. मी दररोज 10 ते 12 तास अभ्यास करत होते. परीक्षेसाठी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय हे दोन विषय निवडले होते. वडिल राजकीय नेते आहेत, तर आईही वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावते.
“आमच्या कुटुंबातील सर्वचजण वेगवेगळ्या क्षेत्रात समाजसेवेचं काम करतात. त्यातूनच मीही आयएएस अधिकारी बनून समाजसेवा करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार, प्रयत्न केले, मेहनत घेतली आणि त्याचं फळ मिळालं, भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी काम करायला जास्त आवडेल”
– अंजली बिर्ला