बैतूल : मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये पोलिसांनी महाराष्ट्रातील शेतकरी नेते अरुण बनकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बनकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यालय आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.
बैतूलच्या कोतवाली पोलीस ठाण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आदित्य शुक्ला यांनी तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी बनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अद्याप या प्रकरणात अटक झालेली नाही. तक्रारदार आदित्य शुक्ला यांनी सांगितले की, अरुण बनकर यांनी जनतेला चिथावणी देऊन समाजात शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न केले आहे. पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून दिल्लीमार्गे बैतूल येथे शेतकऱ्यांच्या एका रॅलीदरम्यान शेतकरी नेते अरुण बनकर यांनी सोमवारी मुलताईमध्ये ‘शहीद किसान स्तंभ’ येथे श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर तिथे शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या तर, आम्ही नागपूरमध्ये संघ कार्यालय आणि सरसंघचालकांना बॉम्बने उडवून देऊ, अशी थेट धमकी दिली. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.