कणकवली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या दोघांनाही शेतीतलं काय कळतं? असं विचारतानाच कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो, हे तरी यांना माहीत आहे का? असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी कणकवलीत केला.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भाजपने सिंधुदुर्गात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या सत्तर वर्षांमध्ये जे काँग्रेसला जमलं नाही. ते मोदींनी करून दाखवलं. ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही तिच काँग्रेस आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना पिकवलेला माल विकायलाही बंधने होती. तोट्यात माल विकला जायचा. मेहनतीचा पैसाही त्यांना मिळत नव्हता. सत्तर वर्षातील हे नियम मोदींनी मोडून काढले. आज त्यालाच काँग्रेसने विरोध सुरू केला आहे, अशी टीका राणे यांनी केली.
* भाजपच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते
काँग्रेसने काही दलालांना फूस लावून शेतकरी आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेसने दलालांना कामाला लावलं आहे. हे राजकीय आंदोलन आहे. त्यामुळे त्यात सेटलमेंट होईल असं वाटत नाही, असं राणे म्हणाले. राहुल गांधींना शेतीतलं काय कळतं. ते काय बोलतात हे त्यांना कळतं का? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्यांना शेतीतलं काय कळतं? कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो? हे तरी यांना माहीत आहे का? असा सवालही त्यांनी केला. भाजप शेतकऱ्यांसाठी विधायक कामं करत आहे. भाजपच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, असंही ते म्हणाले.