मुंबई : काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? यावरुन राज्यात मोठी चर्चा रंगली आहे. नाना पटोले, विजय वडेट्टीवार व राजीव सातव यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, हे तिघेही बाहेरुन पक्षात आलेले असल्याने त्यांना जोरदार विरोध होतोय. या तिघांऐवजी निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी होतीय. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवाजीराव मोघेसह इतरांना संधी देण्याची मागणी होत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी सुरु झालीय आणि त्यात निष्ठावान विरूद्ध आयाराम गयाराम अशी धुसफूस चर्चिली जातेय.
खासदार राजीव सातव, नाना पटोले, आणि विजय वडेट्टींवार या तीन नेत्यांची नावं आघाडीवर आहेत. पण ह्या तिनही नेत्यांनी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर काँग्रेस सोडून इतर पक्षात प्रवेश केला होता आणि आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये आहेत. त्यावरच काँग्रेसचे काही नेते सातव, वडेट्टीवार आणि पटोले यांच्या नावाला विरोध होत आहे.
काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी सध्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. आमदारांच्या वारंवार भेटीगाठी घेऊन त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठा नेत्याची वर्णी लावल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेत्याची वर्णी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळेच या स्पर्धेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खास मर्जीतले राजीव सातव, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले या ओबीसी नेत्यांच्या नावावर गंभीरपणे विचार सुरू आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे दोन्ही समाजात बॅलेन्स साधण्यासाठी काँग्रेसकडून ही कसरत करण्यात येत आहे. शिवाय या तिघांमधील समान बाब म्हणजे हे तिन्ही नेते दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले आहेत. ते मूळ काँग्रेसी नाहीयेत. त्यामुळे बाहेरच्यांना अधिक महत्त्व दिलं जात असल्याने पक्षातून कुरबुरी सुरू झाल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले आहेत. 1998 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती. त्यावेळी सोनिया गांधींच्या विदेशीत्वाच्या मुद्द्यावरून राजीव सातव आणि त्यांची आई रजनी सातव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही मायलेकांनी सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उचलून प्रचाराचे रान माजवलं होतं. मात्र, तरीही रजनी सातव यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
एनसीपीत पुढे काही भविष्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2003-04 मध्ये दोघांनीही काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी सातव यांच्या प्रवेशाला निष्ठावान काँग्रेसींनी विरोध केला होता. मात्र, विलासरावांपुढे कुणाचे काहीच चालले नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची शक्यता वाटल्याने सातव यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यास त्यांच्या निष्ठेवर पुन्हा प्रश्नचिन्हं उपपस्थित केले जातील. पक्षातील जुने कार्यकर्ते त्यांना स्वीकारतील की नाही? याबाबत राजकीय जाणकार शाशंकता व्यक्त करत आहेत.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाचीही चर्चा आहे. वडेट्टीवार हे शिवसेनेत असताना नारायण राणे यांचा उजवा हात समजले जायचे. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर वडेट्टीवार यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पदाच्या रेसमध्ये नाना पटोलेही तिसरे दावेदार आहेत. एकेकाळी पटोले काँग्रेसला सोडून भाजपमध्ये सामिल झाले होते. मात्र, भाजपच्या कार्यपद्धतीला वैतागून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा घर वापसी केली. या तिघांशिवाय नीतीन राऊत, यशोमती ठाकूर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवाजीराव मोघेंसह इतरांचीही नावे समोर येत आहेत.