बार्शी : ड्युटी संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी परतत असलेल्या महिला पोलिस शिपाईवर तुळजापूर रस्त्यावरील शेलगावच्या अलीकडे चौघाजणांनी तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.
याबाबत जखमी रेशमा पांडुरंग सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्याच्या पोलिस दलाचे प्रमुख पद महिला अधिकारी भूषवित असताना पोलिस दलातीलच एका महिला कर्मचार्यावर दलातील कर्मचार्याकडून अशा प्रकारचा हल्ला झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे.
रेशमा सुतार या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्यांनी यापूर्वी त्यांची छेड काढणार्या पोलिस विभागातील कर्मचार्यावर संशय व्यक्त केला आहे. अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणालाही याप्रकरणी ताब्यात घेतलेले नाही. विशेष म्हणजे हल्ल्याचा प्रकार गुरुवारी (ता.7) सायंकाळी 7 वाजता घडला असूनही फिर्याद दुसर्यादिवशी दुपारी 3 वाजता दाखल झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रेशमा सुतार या वैराग पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तेथे त्या कार्यरत असताना त्यांना डोळस या सहकार्याने वारंवार त्रास दिला. छेड काढली. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्या तक्रारीनंतर त्यांना तात्पुरत्या स्वरुपात बार्शी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात प्रतिनियुक्त करण्यात आले आहे. तर अरोपी पोलिस शिपाई सध्या जिल्हा मुख्यालयात कार्यरत आहे.
गुरुवारी त्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील आपली डयुटी संपवून तालुक्यातीलच साकत पिंपरी या आपल्या गावी शेलगाव(मा.) मार्गे स्कूटीवरुन जात होत्या. शेलगावच्या अलीकडे अर्धा ते पाऊण किमी. त्या आल्या असता पाठीमागून दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघाजणांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या स्कूटीवर लाथ मारली. अचानक बसलेल्या धक्क्याने त्यांचा तोल जावून त्या दुचाकीसह खाली पडल्या.
यावेळी पुढे बसलेल्या व्यक्तीने माझ्यावर गुन्हा दाखल कर, तसेच पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने माझा मेहुणा डोळस वर गुन्हा दाखल करते का, कर अशी धमकी दिली. त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुसर्या दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने आत तू कशी घरापर्यंत पोहचते ते बघतोच, तुला आज जिवे ठार मारत असतो. घरापर्यंत तुझं मडंच पोहच करतो, असे म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील धारदार शस्त्र त्यांच्या डोक्यावर मारला. मात्र सुदैवाने महिला पोलिसाने तो वार चुकविल्यामुळे त्या वाचल्या. यावेळी समोर बसलेल्या व्यक्तीने तिला जिवंत सोडायचे नाही, अशी धमकी दिली.