भंडारा : महाराष्ट्रात मध्यरात्री दोनच्या सुमारास अत्यंत दुःखद घटना घडली. भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. यात दहा बालकांचा मृत्यू झाला. तर सात बालकांना वाचवण्यात यश आले. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही आग लागली होती. रूग्णालयाला पोलीसांनी वेढा घातला आहे.
भंडा-यात शनिवारी मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागली. या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. ही अत्यंत धक्कादायक घटना आहे, अशा घटना घडू नयेत, यासाठी काळजी घेतली जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर भंडाऱ्याला रवाना झाले आहेत. त्यांनी या आगीला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये ( SNCU ) शॉर्ट सर्किटने आग लागल्याने दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बाॅर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. या शिशु केअर युनीटमधील सात बालकांना वाचविण्यात आले आहे.
अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये आउटबॉर्न आणि इन बाॅर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले. तर आऊट बाॅर्न युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.
रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते दाखल. रुग्णालयाला पोलिसांचा वेढा असून आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूर येथून भंडारा रुग्णालयात पहाटे ५.३५ वाजता दाखल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे.