सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या विषय समिती सभापती निवडीत भाजपला मतदान केल्याची कबुली व्हिडिओद्वारे देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका तस्लीम इरफान शेख यांना “एमआयएम’मधून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या याच व्हिडिओचा आधार घेत एमआयएमच्या वतीने कारवाईबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविला होता. या अहवालाची दखल घेत ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
भाजपला मतदान करणाऱ्या नगरसेविका शेख यांना एमआयएममधून निलंबित करण्याचे आदेश महाराष्ट्र एमआयएमचे कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल कादरी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार त्यांच्या निलंबनाची घोषणा सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी पत्रकार परिषदेत केली.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएम प्रयत्न करत असताना महापालिकेच्या विषय समिती सभापती निवडीत भाजपलाच मतदान करणे, हे अत्यंत गंभीर असल्याचेही शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सांगितले. यापुढे तस्लीम शेख यांचा उल्लेख एमआयएमच्या नगरसेविका म्हणून करू नये, असे आवाहनही शाब्दी यांनी केले आहे.
सोलापूर महापालिका विषय समिती सभापती निवडीत एमआयएमच्या गटनेत्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करायला हवी होती. त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे की नाही? याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली जाणार आहे. गटनेते दोषी असतील, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा शहराध्यक्ष शाब्दी यांनी दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या पत्रकार परिषदेला नगरसेविका वाहिदा भंडाले, नगरसेवक गाझी जहागीरदार, एमआयएमच्या वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रियाज सय्यद, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष शकील शेख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेश्मा मुल्ला, मोहसिन मैंदर्गीकर, कम्मो शेख आदी उपस्थित होते.
* ‘त्या’ सहा नगरसेवकांचाही पाठविला प्रस्ताव
सोलापूर महापालिकेतील एमआयएमचे सहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. या नगरसेवकांवरदेखील कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष शाब्दी यांनी दिली.
या सहा नगरसेवकांमध्ये तौफिक शेख, तस्लीम शेख, वाहिदा शेख, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड व साजिया शेख यांचा समावेश आहे. या सहा नगरसेवकांच्या बाबतीत पक्षाकडून निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतची अधिकृत घोषणा पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याची माहिती शाब्दी यांनी दिली.