सोलापूर : उपमहापौर राजेश काळे यास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पक्षाची बिघडत चाललेली शिस्त आणि पक्ष हितास धोकादायक कृती केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली.
महापालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्या प्रकरणी राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी काळे यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनीही अहवाल पाठवला होता. पक्षाचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांनी सोलापुरात येऊन या प्रकरणाची माहिती घेतली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अहवाल पाठवण्यात आला. प्रदेश भाजपने काळे यांची हकालपट्टी झाल्याचे जाहीर केले.
महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यानंतर उपमहापौर राजेश काळेविरुध्द सदर बझार पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. सात- आठ दिवसानंतर पोलिसांनी सोलापूर- तुळजापूर रोडवरील श्री रुपाभवानी मंदिर परिसरात काळेला पोलिसांनी अटक केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. तत्पूर्वी, काळे यांच्याबद्दल सत्ताधारी नगरसेवकांनी अनेकदा शहराध्यक्षांकडे तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, त्यांच्याविरुध्द यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांची कृती पक्ष हितासाठी धोकादायक असल्याने पक्षाने पक्षीय बलाबल पाहण्याऐवजी पक्ष शिस्तीला प्राधान्य दिल्याचेही देशमुख म्हणाले. महापालिकेत विरोधकांच्या तुलनेत सत्ताधारी भाजपचे पक्षीय बलाबल काठावर आहे. अशा परिस्थितीत पक्षश्रेष्ठींनी त्याचा विचार न करता शिस्तीला प्रधान्य देत हा निकाल दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
* नागेश वल्याळ यांचे नाव आघाडीवर
राजेश काळे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरुध्द कारवाईचा अहवाल शहरातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला होता. काळे यांना पक्षाने बडतर्फ केले आहे. त्यानंतर आता महापालिकेचा नवा उपमहापौर कोण, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. महापौर महिला असल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नव्या, अनुभवी चेहऱ्याला उपमहापौरपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्यानुसार नागेश वल्याळ यांचे नाव आघाडीवर असल्याचीही चर्चा आहे.