सोलापूर : सोलापूरकरांचे ज्या कोरोना लसीकडे लक्ष लागले होते, ती लस अखेर आज बुधवारी (ता.१३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोलापुरात दाखल झाली. सोलापुरात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. सोलापुरात ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आज पहिल्या टप्प्यातील ३४ हजार डोस दाखल झाले आहेत. पुढील चार हजार लस येणार आहे. रिॲक्शनच्या भीतीने सुरुवातीला लस घेण्यास काहीजण धजावणार नसल्याचे सांगितले जात आहे.
पुणे येथून लस घेवून येणारे लस भांडारपाल दिनेश नन्ना व वाहन चालक यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे, सहाय्यक संचालक कृष्ठरोग डॉ. संतोष जोगदंड, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दुधभाते व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची गडबड सुरू असतानाच आता आरोग्य विभागात लसीकरणाची घाई सुरू झाली आहे. पोर्टलवर नोंद असलेल्या ३८ हजार आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना पहिल्या टप्प्यातच लस देण्यात येणार आहे. लस दाखल झाल्यानंतर पुढील नियोजन वेगाने होणार आहे.
शहर आणि जिल्ह्यात अठरा बूथ निश्चित केले आहेत. या बूथवरून प्रत्यक्ष लसीकरण करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लसीकरणासाठी पुण्यातून बुधवारी लस घेऊन गाडी सोलापुरात दाखल झाली. सिव्हिल हॉस्पिटलमधून संबंधित बूथवर ही लस १६ जानेवारी रोजी निर्धारित केलेल्या वेळेत पोहोचवली जाईल. लसीकरणासाठी लागणारी सर्व साधनसामग्री लवकरच केंद्रावर पोहोच करण्यात येणार आहे.