मुंबई : धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यातच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी ‘कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही’ असे म्हटले. तर, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी ‘मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पक्ष म्हणून आम्ही तातडीने अन्याय होणार नाही असा निर्णय घेऊ’ असे म्हटले आहे. त्यामुळे आता नक्की काय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घेण्याची आवश्यकता, विश्वासात घेऊन पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा, पक्षप्रमुख म्हणून काही काळजी आणि निर्णय घ्यावे लागतील, असे माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.
दरम्यान या विषयावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आज महत्त्वाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल बैठकीला उपस्थिती होती. धनंजय मुंडे प्रकरणी चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
* शरद पवार नेमके काय म्हणाले
धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. मला भेटून एकंदर त्यांच्या आरोपाची स्थितीची सविस्तर माहिती मला दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण असं होईल, व्यक्तीगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा, त्यामुळे त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली आणि कोर्टाचा एकप्रकारचा एक आदेश हायकोर्टाचा आदेश होता त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मंत्री नवाब मलिक प्रकरणावरही मत
नवाब मलिकांच्या नातेवाईकावर आरोप झालाय, याबाबत संबंधित यंत्रणेने अटक केलं आहे, त्यामुळे त्या यंत्रणेने पूर्ण सहकार्य केलं आहे, तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना पूर्ण सहकार्य संबंधितांकडून केलं जाईल याची काळजी घेतली जाईल, नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाही. ते अनेक वर्षापासून महाराष्ट्रासाठी काम करतात. विधीमंडळात ते काम करतात. त्यांच्यावर आजपर्यंत आरोप झालेला नसल्याचे शरद पवारांनी सांगितले.
* पक्ष व शरद पवार जे म्हणतील, ते मी करणार – धनंजय मुंडे
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर त्यांच्यावरील आरोपांसंदर्भात आज कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्यावरील आरोपासदर्भात मी पक्ष आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांना माहिती दिली आहे. मी त्यांना सर्व सांगितले, आता पक्ष आणि पक्षप्रमुख शरद पवार जे सांगतील, ते मी करणार’, असे मुंडे यांनी आज मुंबईत म्हटले. दरम्यान मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहे.