अक्कलकोट : वळसंग गावाजवळील न्यु वळसंग वाडा हॉटेलजवळ मोटरसायकलवरील दोन तरुणांना अज्ञात कंटेनरने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. मयत दोघे जिवलग मित्र होते. दोघेही वळसंग गावचे रहिवासी आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला.
या अपघातानंतर कुंभारीजवळ ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. घाबरुन चालकाने कंटेनर तिथे सोडून पलायन केले. नागरिकांनी काही वेळ रस्ता बंद केला होता. पुन्हा रात्री अकरानंतर वाहतूक सुरळीत झाली. वळसंग पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सकलेन मोहम्मद कासिम कुरेशी (वय २०) व रोहित बाळू चौगुले (वय १९, दोघे रा. वळसंग ) असे मयत दोघा मित्राची नावे आहेत. दोघेही मोटरसायकलवरून गावी निघाले होते. त्यावेळी भरधाव निघालेल्या कंटेनरने दोघांना जोराची धडक दिली. या तरुणांच्या डोक्यावरून चाक गेल्याने दोघेही जागीच ठार झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांचे मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. तरुणांना चिरडल्यानंतर हा कंटेनर पुढे तसेच गेला. त्यानंतर कुंभारी जवळ एका मोटर सायकलला त्याने जोराची धडक दिली. तेथेही घरी निघालेल्या मोटारसायकलवरील दोघांना जखमी केले. तसेच एका कारलाही धडक दिली. यामध्ये कुंभारीजवळही दोघे जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.