नवी दिल्ली : देशात लसीकरणाचा पहिला दिवस यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टरांनी स्वदेशी ‘कोव्हॉक्सिन’ लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या सुरक्षतेबाबत चर्चा सुरु आहेत. दरम्यान, कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे डॉक्टरांना चिंता वाटत असावी, असं सांगण्यात आले आहे.
स्वदेशी कोव्हॅक्सिन लशीच्या परिणामकारकतेबाबत डॉक्टरांनाच खात्री नसल्याची चर्चा सुरू आहे.
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टरांनी ‘कोव्हॅक्सिन’ ही भारत बायोटेकनिर्मित स्वदेशी लस टोचून घेण्यास नकार दिला.
नागपूरमधील ‘मेडिकल’ या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आपल्याला ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशील्ड’ लस देण्यात येईल, अशा अपेक्षेने डॉक्टर तेथे पोहोचले. परंतु तेथे स्वदेशी कोव्हॅक्सिन लस दिली जात असल्याचे समजल्यावर काही डॉक्टर या केंद्रातून आल्या पावली परतले. त्यामुळे स्वदेशी कोव्हॅक्सिन लशीच्या परिणामकारकतेबाबत डॉक्टरांनाच खात्री नसल्याची चर्चा सुरू होती.
दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी ‘कोव्हिशील्ड’ लस देण्याची मागणी केली आहे. ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे डॉक्टरांना चिंता वाटत असल्याचे राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले. या रुग्णालयात सर्वप्रथम सुरक्षारक्षकाला लस टोचण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* ‘कोव्हिशील्ड’ लसीचाच बोलबाला
नागपूरच्या एकूण १२ पैकी मेडिकल या एकाच केंद्रावर स्वदेशी कोव्हॅक्सिन लस, तर इतर केंद्रांवर ऑक्सफर्डविकसित आणि सीरम उत्पादित कोव्हिशील्ड लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात होती. ‘मेडिकल’मध्ये पहिली लस डॉ. रिना बलबिरसिंग रुपराय यांनी घेतली. त्यानंतर हळूहळू मेडिकलच्या लसीकरण केंद्रावर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी येऊ लागले. परंतु या केंद्रावर ‘कोव्हिशील्ड’ऐवजी स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जात असल्याचे निदर्शनास आल्यावर काही डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. इतर सर्व केंद्रांवर ‘कोव्हिशील्ड’ लस दिली जात असताना आम्हालाच ‘कोव्हॅक्सिन’ का, असा त्यांचा प्रश्न होता.
भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी या डॉक्टरांना समजावून सांगितले. परंतु डॉक्टरांनी लस घेण्यास नकार दिला आणि परतीचा मार्ग धरला. परिणामी, लसीकरणाचे निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी गैरहजर डॉक्टरांना भ्रमणध्वनी करून लसीकरणासाठी बोलावण्यात आले. या खटाटोपानंतर लसीकरणाचे प्रमाण वाढले आणि ते ५३ टक्के नोंदवले गेले.
* पुण्याच्या ‘कोव्हिशील्ड’चा आग्रह
दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचून घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी ऑक्सफर्डने विकसीत केलेली आणि सीरम संस्थेने उत्पादित केलेली ‘कोव्हिशील्ड’ लस देण्याची मागणी केली आहे. नागपूरमधील सर्व केंद्रांवर ‘कोव्हिशील्ड’ लस दिली जात असताना आम्हालाच ‘कोव्हॅक्सिन’ का, असा प्रश्न ‘मेडिकल’मध्ये लसीकरणासाठी आलेल्या डॉक्टरांनी केला.