मुंबई : ‘तांडव ‘ वेब सीरिजवरुन सध्या वाद सुरू आहेत. त्यातच आता दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. ‘भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो’, असं तांडव वेब सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्वीट केलं आहे.
या वेब मालिकेत हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याच्या आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात तांडव विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तांडव वेबसीरिजवरुन होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. गेल्या आठवड्यात अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसिद्ध झालेल्या वेबमालिकेत हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याच्या आरोप करण्यात येत आहे.
पॉलिटिकल ड्रामावर आधारित ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, गौहर खान, जीशान अयूब , सुनिल ग्रोव्हर यांनी भूमिका केल्या आहेत. नऊ एपिसोड असणाऱ्या या वेब सीरिजमधून दिल्लीच्या आणि विद्यापीठाच्या राजकारणावर भाष्य करण्यात आलं आहे.
काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वेब सीरिज विरोधात मत व्यक्त करताना त्यातून डाव्या विचारसरणीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचाही आरोप केला आहे. तसेच अनेकांनी हा हिंदू विरोधी प्रचार असल्याचं मतही व्यक्त केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यासंदर्भात माहिती व प्रसारण मंत्रालयाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात तांडव विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मालिकेचे दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात रविवारी रात्री उशिरा लखनौच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
‘तांडव’ वेब सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये एका विद्यापीठाच्या नाटकामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत असलेल्या जीशान अयूबला नारदाच्या भूमिकेतील व्यक्ती म्हणते की, “भगवान, काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतंय की, आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी.” त्यावर जीशान अयूब म्हणतो, “मग काय करु, बदलू का?” त्यावर नारद पुन्हा म्हणतो, “भगवान तुम्ही खूपच भोळे आहात.”
या दृष्याला अनेक प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच आणखी एका दृष्यालाही प्रेक्षकांनी विरोध दर्शवला असून त्या दृष्याच्या माध्यमातून दलित विरोधी विचार दाखवल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. या प्रकरणावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर कमेन्ट करण्यात येत असून या सीरिजच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरवर #BanTandavNow हा हॅशटॅगही ट्रेन्ड होतोय.