सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. नऊ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली असली तर तब्बल २५ ग्रामपंचायती त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. कमी मताधिक्य आणि त्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्याने मंत्रीपद गेल्याने मतदारसंघाशी सुभाष देशमुख यांचा संपर्क कमी झाला. त्यात सर्वपक्षीय आघाड्यांनी आघाड्या करुन माजी सहकारमंत्र्यांची अर्थात भाजपची पिछेहाट केल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले.
तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील ३४ ग्रामपंचायतींचा समावेश होता. बाळगी ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर ३३ पैकी ९ ग्रामपंचायती भाजपला राखता आल्या. त्यात होटगी – सावतखेड, इंगळगी, हत्तरसंग, होटगी स्टेशन, औराद, यत्नाळ, कणबस (ग), कारकल, सादेपूर यांचा समावेश आहे. माळकवठे ग्रामपंचायतीतील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे.
भाजपची राज्यातून सत्ता गेल्याने सुभाष देशमुख यांचे मंत्रिपदही गेले. त्याचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला बसला आहे. सत्ता गेल्याने भाजपचे कार्यकर्ते सैरभैर झाले असून, देशमुख यांचा गट विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्ते भाजपकडून लढण्याऐवजी अन्य आघाड्यांमध्ये गेले. त्यामुळे भाजपच्या हातून अनेक ग्रामपंचायती निसटल्या. विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली. परंतु, पक्षीय पातळीवर त्याची मांडणी करण्यात नेते व कार्यकर्ते अपयशी ठरले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुभाष देशमुख यांची सेकंड इनिंग तशी नाराजीतूनच सुरू झाली. ग्रामीण भागातून त्यांचे मताधिक्य घटल्याने त्यांना आपली नाराजी लपवता आली नाही. याविषयी उघडपणे चर्चा सुरू झाली. त्यातून कोविड, अतिवृष्टी, महापूर या संकट काळात भीमा नदीच्या खोऱ्यात देशमुख यांच्याविरोधात सूर आळविण्याचे काम भाजपतूनच सुरू झाले. मतदारसंघाशी सुभाष देशमुख यांचा संपर्क कमी झाला. पुत्र मनिष देशमुख यांच्यावर त्यांनी जबाबदारी दिली. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. याउलट माजी आमदार दिलीप माने यांनी संपर्क वाढवला. वडापूर, सादेपूर, गुंजेगाव , माळकवठे या ग्रामपंचायती माने गटांनी खेचून घेतल्या.
राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते पक्षभेद विसरून सोयीनुसार एकत्र आले. अनेक ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी करून निवडणुका लढविण्यात आल्या. या निवडणुकीत भाजपची दुसरी फळी कार्यरत नव्हती. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणारा आणि त्यांचे संघटन करणारा नेता नसल्याने भाजपऐवजी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र आघाड्या करून निवडणूक लढणे पसंत केले.
मतदार संघात बाळगी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. अक्कलकोट मतदार संघात समाविष्ट असलेल्या बोरामणी, संगदरी, तीर्थ, दिंडूर, लिंबीचिंचोळी या पाच ग्रामपंचायतींची निवडणूक स्थानिक पातळीवर बिनविरोध झाली. सुभाष देशमुख यांच्या मतदार संघात तसा प्रयत्न कोणत्याही राजकीय नेत्याने अथवा पक्षाने केल्याचे निकालातून दिसून आले नाही.