वॉशिंग्टन : नुकत्याच आटोपलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी बुधवारी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष आणि पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे आजोळ असलेल्या तामिळनाडूमधील गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता विचारात घेऊन या शपथविधी सोहळ्याला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी तब्बल ३५ हजार जवान तैनात करण्यात आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमेरिकेची यावेळची अध्यक्षीय निवडणूक आणि त्यानंतरची सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया कमालीची वादग्रस्त ठरली होती. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव समोर दिसू लागताच निवडणूक प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिंसक गोंधळ घातला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रियाही सुरू झाली होती. दरम्यान, आज मी पुन्हा येईल, असे विधान करत ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसचा निरोप घेतला.
मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले. राजशिष्टाचार म्हणून ट्रम्प हे या सोहळ्याला उपस्थित राहणे अपेक्षित असते. मात्र ते अनुपस्थित राहिले. जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेतील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यांच्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन तसेच जॉर्ज बुश हे माजी राष्ट्राध्याक्षही उपस्थित होते.
* तामिळनाडूमध्ये आनंदोत्सव साजरा
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा शपथविधी झाला. यादरम्यान तमिळनाडूतील कमला हॅरिस यांच्या मूळगावी तुलासेंतीरापूरम पेन्गनाडू येथे उत्साहाचे वातावरण होते. कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन यांचा जन्म चेन्नईत झाला होता. पीएच.डी करण्यासाठी त्या १९ व्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित झाल्या होत्या. तिरुवरुर जिल्ह्यातील तुलासेंतीरापूरम पेन्गनाडू हे हॅरिस यांचे मूळ गाव आहे. तिथे त्यांच्या आईकडचे अनेक नातेवाईक आहेत.
उपाध्यक्षपदी हॅरिस विराजमान झाल्याने गावात उत्साही वातावरण आहे. बुधवारी सकाळीच दहा वाजल्यापासूच तेथे आनंद साजरा करण्यास सुरुवात झाली होती. घरासमोर रांगोळीतून शुभेच्छा दिल्या. गावातील श्री धर्मसंस्था मंदिरात विशेष पूजा व हवन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडण्यात आले व लाडू वाटप झाले. हॅरिस यांच्या अभिनंदनाचे फलकही लावले होते, असे सरपंच जे. सूतकर यांनी सांगितले.