मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरिष्ठ मंडळी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत. त्याचा अहवाल राज ठाकरे यांना देतील. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जाईल. त्या दिवशी मराठी स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात येईल.
राज ठाकरे मुंबई आणि ठाणेमध्ये सही करण्यासाठी जातील. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मान मनसे करणार आहे. मराठी वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एप्रिलपर्यंत आपण मनसे सदस्य नोंदणी करणार आहोत. त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळखपत्र देण्यात येईल. गटाध्यक्षांना नव नाव ‘राजदूत’ देण्यात येणार त्यांना बिल्ला देण्यात येईल. राजकारणापलीकडच्या सुशिक्षित लोकांनी सूचना कळवाव्यात, त्यांच्या कल्पनांचा शहरांच्या विकासासाठी स्वत:हून काम करणाऱ्या लोकांना राज ठाकरेंच्या स्वाक्षरीचं पत्र दिलं जाईल, असं नांदगावकर म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी नवनवीन संकल्पना यावर मनसेच्या बैठकीत चर्चा झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर , अविनाश अभ्यंकर , गजानन काळे , विविध नेते उपस्थित होते. मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करुन, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. सर्व महापालिका स्तरावर ही एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल.
* मनसे आणि भाजपच्या युतीची नांदी ?
मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता.
मनसेची उत्तर भारतीयांविरोधाची भूमिका मवाळ झाली तर पुढचा विचार होऊ शकेल, असंही भाजपकडून विधान करण्यात आलं होतं. आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानं ही मनसे आणि भाजपच्या युतीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आजही सोलापुरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुनर्रउच्चार केला.
* बैठकीला पहिल्यांदाच राज ठाकरेंची सून उपस्थित
मनसेची आज (शुक्रवार) वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये बैठक झाली. या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित होते. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अमित ठाकरे यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सून मिताली ठाकरे यांनी. दरम्यान, या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी नवनवीन संकल्पना यावर चर्चा झाल्याचे समजते.