पुणे / सोलापूर : एका महिला शिक्षिकेला केवळ जुजबी तोंड ओळख असलेल्या तरुणासोबत जेजुरीला जाणे चांगलेच महागात पडले. त्या तरुणाने शिक्षक महिलेचे 75 हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. रस्त्यातच गाडीतून बाहेर काढून हाकलून दिले.
पुणे – सासवड रोडवरील उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (दि. 26) ही घटना घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी योगेश पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या तरुणाच्या विरोधात फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुरेखा चंद्रकांत जवळकर (वय – 48 रा. न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या महिला शिक्षेकेचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा जवळकर या सोलापूर जिल्ह्यात एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या दीड वर्षापूर्वी कामानिमित्त करमाळा येथे गेल्या असता, त्या ठिकाणी त्यांची योगेश पाटील यांच्याशी ओळख झाली होती. दरम्यान मंगळवारी (दि. 26) पुण्यात शैक्षणिक काम असल्याने सुरेखा जवळकर पुण्यात आल्या होत्या. ही बाब आरोपी पाटील याला समजताच त्याने जवळकर यांना फोन करुन जेजुरीला फिरण्यास चलण्याची विनंती केली.
त्यानंतर दोघेही जेजुरी येथे फिरायला गेले होते. जेजुरीहून दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्याकडे परतत असताना पाटील यांनी महिलेकडील पैसे आणि सोने पाहून मुद्दामहून लघुशंकेसाठी आपली गाडी रस्त्याच्याकडेला एका हॉटेल शेजारी थांबवली. दरम्यान गाडी थांबताच, पाटील याने जवळकर यांना गाडीतून खाली उतरवले. जवळकर खाली उतरताच पाटील याने आपल्या ताब्यातील चारचाकी गाडी घेऊन पुण्याकडे निघून गेला.
जवळकर यांनी गाडीतून उतरताना आपली पर्स गाडीतच ठेवल्याने, पर्समधील 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पाटील त्याने पळवून नेले. जवळकर यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत पाटील गाडी घेऊन पसार झाला. त्यानंतर पाटील याने मोबाईल फोनही बंद केले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, जवळकर यांनी लोणी काळभोर पोलिसात पाटील याच्या विरोधात तक्रार दाखल केली. लोणीकाळभोर पोलीस तपास करत आहेत.