नवी दिल्ली : भारत सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार 22 जानेवारीपर्यंत कोरोना रुग्णांवर उपचार करताना 162 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनने ही माहिती योग्य नसल्याचे म्हटले आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 734 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला, असे आयएमएने स्पष्ट केले आहे. तसेच सरकारच्या आकडेवारीवर नाराजी व्यक्त केली आहे.
देशात कोरोना काळात 162 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आश्चर्य व्यक्त करत ही आकडेवारी चुकीची असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीपेक्षा अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी मंगळवारी राज्यसभेत माहिती दिली की कोरोना काळात 162 डॉक्टर्स, 107 नर्स आणि 44 आशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. देशाची वैद्यकीय संघटना म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष जयालाल यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून ही आकडेवारी चुकीची असल्याचे म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इंडियन मेडिकल असोसिएशननुसार कोरोना काळात तब्बल 734 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 25 डॉक्टरांचे वय हे 35 पेक्षा कमी होते. असोसिएशनने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की कोरोना काळात किती डॉक्टर आणि कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला याचा तपास केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच मृत्यू पावलेल्या डॉक्टरांचा यथोचित सन्मान व्हावा, अशी मागाणीही असोसिएशनने केली आहे.
कोविड-19 साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 162 डॉक्टर, 107 परिचारिका आणि 44 आशा वर्कर्सनी आपला जीव गमावला असल्याची माहिती, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी मंगळवारी दिली होती. 22 जानेवारीपर्यंत राज्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी तयार केली गेली असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता याबाबत आयएमएचे अध्यक्ष जे.ए. जयलाल यांनी चौबे यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये त्यांनी ही संख्या 734 असल्याचे नमूद केले आहे.
पत्रात प्राध्यापक जे.ए. जयलाल, राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉ. जयेश एम. लेले, मानद सरचिटणीस आयएमए म्हणाले की राज्यसभेत मंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आयएमएने म्हटले आहे की, ‘कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 734 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे, त्यापैकी 431 सामान्य चिकित्सक आहेत. दुर्दैवाने 25 डॉक्टर 35 वर्षाखालील होते.’ पुढे त्यांनी सांगितले, ‘जरी डॉक्टरांना जास्त व्हायरल लोड आणि उच्च प्रमाणातील मृत्यूचे प्रमाणाला सामोरे जावे लागले, तरी त्यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या परंपरेनुसार देशाची सेवा करणे पसंत केले. भारत सरकार ही वस्तुस्थिती स्वीकारण्यात आणि त्याला योग्य महत्त्व आणि मान्यता देण्यात अपयशी ठरले.’
आयएमएने असेही म्हटले आहे, ‘देशातील डॉक्टरांनी एक विनाशकारी साथीच्या रोगाशी लढाई लढली आणि त्या बदल्यात त्यांनी केवळ आपला जीवच गमवावा लागला नाही, तर सरकारने त्यांच्या आकडेवारीची योग्य नोंद देखील ठेवली नाही, हे दुर्दैव आहे.’