मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूर येथे जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. मोदी सरकारने त्यांचे 3 कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी या शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. आज दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 71 वा दिवस आहे.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून बळीराजा ठाण मांडून बसलाय. आम्ही जरुर शहरात राहिलोय, वाढलोय, शिकलोय परंतु आमचं शेतकऱ्यांशी जे नातं आहे ते ईश्वर आणि भक्ताचं नातं आहे. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं. पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसलाय. त्याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जातेय, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूरला जाऊन आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळेही आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर ज्या प्रकारे वागतंय ते पाहून दु:ख होतं. मराठीमध्ये एक म्हण आहे ‘अन्नदाता सुखी भव:… ‘ परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतोय. मी केंद्र सरकारला एक विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ‘एएनआयशी’ त्या बोलत होत्या.
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही एक आंदोलन झालं. अतिशय चांगल्या प्रकारे हे आंदोलन पार पडलं. केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करतंय, अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. आज गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.
* शिवसेना पाठीशी खंबीरपणे उभी
दरम्यान, यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी या शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. आज दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 71 वा दिवस आहे. शिवसेनेचं शिष्टमंडळ आंदोलन स्थळी येताच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यावेळी टिकैत यांना अश्रू अनावर झाले. राऊत आणि शिष्टमंडळाने टिकैत यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं आश्वासनही आंदोलकांना दिलं.