नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारलं आहे. गुजरात भाजपाकडून काल महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली, त्यात सोनल मोदी यांचं नाव कोणत्याही वॉर्डातून घोषित केलं गेलेलं नाही.
ज्या मुलीचा चुलता हा देशाचा पंतप्रधान असेल, पक्षातला सर्वात पॉवरफुल व्यक्ती असेल तिलाच महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट नाकारलं जाऊ शकतं? ज्या काळात स्वत:च्या घरात मंत्रीपद, तीन तीन आमदार अशी स्थिती आहे त्या काळात हे घडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिकेचं तिकीट नाकारलं आहे.
गुजरातमध्ये 6 महापालिकांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यात अहमदाबाद, सुरत, बडोदा, भावनगर, जामनगर अशा मोठ्या महापालिकांचा समावेश आहे. 21 फेब्रुवारीला मतदान टाकलं जाणार. तसेच 81 नगरपालिका, 31 झेडपी आणि 231 पंचायत समितींसाठी 28 फेब्रुवारीला मतदान होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपाकडे तिकीट मागितलं होतं. काल भाजपाकडून उमेदवारांची घोषणा केली गेली. पण त्यात सोनल मोदी यांचं नाव कुठल्याच वॉर्डातून घोषित केलं गेलेलं नाही. याबाबत भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना विचारलं असता, सर्वांसाठी नियम सारखे आहेत. आणि नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचं नाही असा पक्षाचा निर्णय झाल्याचं म्हणाले. त्यानुसारच मोदींच्या पुतणीला तिकीट नाकारलं गेल्याचं कळतंय.
गुजरात भाजपा संसदीय मंडळाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कार्यकर्त्यांना आणि ज्यांनी नगरसेवक म्हणून तीन वेळा काम केले आहे अशांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका) निवडणुकीसाठी निवडणूक लढविण्यासाठी तिकीट दिले जाणार नाही. गुजरातमध्ये 6 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
तिकीट नाकारल्यानंतर सोनल मोदी यांची प्रतिक्रिया बोलकी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी म्हणून नाही तर भाजपाची एक कार्यकर्ती म्हणून तिकीट मागितलं होतं असं सोनल म्हणाल्या. सोनल मोदी ह्या मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या आहे. प्रल्हाद मोदी यांचं किराणा मालाचं दुकान आहे आणि त्या संघटनेचे ते अध्यक्षही आहेत. सोनल मोदी ह्या भाजपात काही काळापासून काम करतात.