पुणे : शेतकरी आंदोलनावरून ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींनाही अजित पवार यांनी झापले. शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलनाला बसले होते. त्यावेळी तुम्हाला मत मांडायला कोणी रोखलं होतं. आता एका पॉप सिंगरने ट्विट केल्याने तुम्हाला जाग कशी आली?, असा सवाल करतानाच परदेशी सेलिब्रिटींनी आंदोलनावर बोलणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यात काही गैर नाही. परदेशातही एखादी धक्कादायक घटना घडल्यावर आपण व्यक्त होतोच ना? असा सवालही त्यांनी केला.
केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यावरून शेतकरी मागच्या दोन महिन्यांपसून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहे. त्यात या शेतकऱ्यांना अनेक सेलिब्रिटींना पाठिंबा दर्शवला आहे. यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्या सेलिब्रिटींना चांगलेच झापले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यावेळी का मत व्यक्त केले नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशातील सेलिब्रिटींना केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिल्लीत गेल्या ७० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर अमेरिकी पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं चिंता व्यक्त केली होती. त्यावरून भारतातील काही क्रिकेटपटू व बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असंही रिहाना व थनबर्ग हिला सुनावले गेले होते.
या संदर्भात अजित पवार यांनी आज आपले रोखठोक भूमिका मांडली होती. भारतातील शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे बाहेरच्या एका सेलिब्रिटीला वाटले. ते त्यांचे मत असून, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण त्यानंतर इथे कोणाकोणाला जाग यायला लागली. शेतकरी थंडी वाऱ्यात बसलाय, काहींचे मृत्यू झाले, हे त्यांना दिसले नाही का,’ अशी विचारणाही त्यांनी केली.