सोलापूर : भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कटेकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. यात 20 ते 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
जखमी शिरीष कटेकर यांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळे फासून साडी बांगड्यांचा आहेर दिला होता. एवढ्यावरच न थांबता त्यांना मारहाण केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘आन रे ती कुकरी’ याला संपवूनच टाकू असे म्हणत त्यांना धमकी दिली होती. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस कटेकर यांनी फिर्याद दाखल केली. यावरुन संदीप केंदळे, बाळू देवकर, रवी मुळे, सुधीर अभंगराव, जयवंत माने, वनारे, बुरांडे (सर्व. रा. पंढरपूर ) यांच्यासह 20 ते 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
* काय घडले होते
शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जैन मंदिराजवळ नामदेव पायरी पश्चिम द्वार पंढरपूर, येथे कटेकर यांना बोलावून शिवसेनेचे संदीप केंदळे, बाळू देवकर, रवी मुळे,सुधीर अभंगराव, जयवंत, माने, वनारे, बुरांडे यांच्यासह 20 ते 25 अनोळखी लोकांनी त्यांच्या तोंडाला काळे फासत मारहाण केली, तर यातील काही जणांनी आन रे ती कुकरी याला आता संपवून टाकू अशी धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसैनिकांनी कटेकर यांना निळसर रंगाचा चिकट द्रव पदार्थ डोक्यावर व अंगावर टाकला. तसेच हिरव्या रंगाची बांगड्याची माळ गळ्यात टाकून निळ्या रंगाची साडी डोक्यावर टाकली. त्यावेळी त्यातील काही कार्यकर्त्यांनी कटेकर यांच्या सर्वांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे कटेकर हे जखमी झाले. तसेच सदर आरोपींपैकी एकजण मोठ्याने म्हणाला की, कुकरी घेऊन ये याला आता संपवून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले.