जेजुरी : मार्तड देव संस्थानाकडून जेजुरी गडावर उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार आणि अहिल्यादेवी यांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक आहे. शरद पवारांसारख्या पुतळ्याचे उदघाटन होणे म्हणजे अहिल्यादेवींचा अपमान आहे, असं त्यांनी म्हटलं.
गोपीचंद पडळकर यांच्यासह त्याच्या काही कार्यकर्त्यांनी जेजुरी गडावर गोंधळ घालत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी जेजुरी देवस्थानच्या काही कर्मचाऱ्यांसोबत त्यांची झटापट झाल्याची घटनाही याठिकाणी घडली आहे. इतकेच नव्हे तर यावेळी पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.
खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र आज पहाटे अचानक भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांनी शरदा पवार यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.
यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, अखंड भारताचे दैवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा जेजुरी संस्थानाने उभारला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी उपेक्षित समुदायासाठी मोठं काम केलं आहे. त्यांचा पुतळा उभारण्याचं चांगलं काम संस्थाननं केलं आहे. या पुतळ्याचं अनावरण उद्या शरद पवार यांच्या हस्ते करण्याचं ठरवलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण, शरद पवारांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावताना विचार करावा. कारण त्यांच्या आणि अहिल्याबाई यांच्या विचारात फार तफावत आहे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या पुतळ्याच्या पायावर माल्यार्पण करुन उद्घाटन झालं असं जाहीर करतो, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर, महाराष्ट्रातील आमच्यासारख्या अनेक युवामित्रांचं म्हणणं होतं की शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या हस्ते उद्घाटन होणं हे अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखं आहे. आमचा पुतळा अनावरणाला विरोध नाही. मात्र भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. शरद पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही या पुतळ्याचं उद्घाटन करु नये, असंही पडळकर म्हणाले.
* गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे.