जळगाव : जळगावात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा करिष्मा आता दिसू लागला आहे असंच म्हणावं लागणार आहे. कारण, त्यांच्या समर्थकांनी ‘भाजप’ला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा सिलसिला सुरू केला आहे. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपला सोडचिठ्ठी देताच खडसेंनी आता आपली पॉवर दाखवण्यास सुरुवात केली आहे.
भुसावळमधील 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवक व कुटुंबियांनी जळगाव इथं राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थक उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एकूण 31 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्यांचा सत्कार केला. भाजपमधून जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक माजी नगसेवक व आजी माजी नगरसेवकांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश आहे.
* भाजपला थेट दिला होता इशारा
एकनाथ खडसेंनी शनिवारीच एका आयोजित मेळाव्यामध्ये भाजपला थेट इशारा दिला होता. यावेळी ‘मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल”, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिला होता. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीनं एक मेळावा आयोजित केला होता, त्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.
नाथाभाऊला कसे तुरुंगात टाकता येईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु मी आयुष्यभर कधीही दोन नंबरचे धंदे केले नाहीत. जिल्ह्यात कोणाकडून नोकरीसाठी किंवा भरतीसाठी एक रुपया घेतला नाही. असे असेल तर कुणी सांगावे, तोंडात शेण घालावे, असं म्हणत त्यांनी भाजपलाही खडे बोल सुनावले.
* खडसे गिरीश महाजनांवर भडकले
या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे, एकनाथ खडसे मुक्ताईनगरच्या संवाद यात्रेत गिरीश महाजन यांच्यावर भडकले होते. पाच वर्षांच्या कालखंडात गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना एकावेळेसही नाथाभाऊंचा मतदारसंघ असल्यामुळे मुक्ताईनगरला फिरकले नाहीत. अरे हा दुष्काळी तालुका आहे. सिंचनाचा प्रश्न आहे. एक रुपया त्यांनी दिला नाही. मुक्ताईनगर अनेक सिंचनाचे प्रश्न तेव्हापासून रखडलेले आहेत. गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून जामनेरमध्ये सिंचनाची कामे झाली नाहीत, त्या ठिकाणी जी कामे झाली असतील ते एकनाथ खडसे यांच्यामुळे झाली आहेत, अशीही टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली.