आज सारे जग व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना स्मरण होते ते १९५०-६०च्या दशकांत तेव्हाच्या तमाम तरुणाईची अनभिषिक्त व्हॅलेंटाईन बनून राहिलेल्या अभिनेत्री मधुबालाची. तिचा आज जन्मदिन.
१९३३मध्ये आजच्या दिवशी जन्मलेली मुमताज जहाँ देहलवी सिनेमाच्या दुनियेत मधुबाला बनली आणि बघता बघता बॅालिवूडची मेर्लिन मॅनरो हीच तिची ओळख बनली.
अवघ्या ३६ वर्षांचे तिचे आयुष्य. त्यातून अखेरची काही वर्षे तिला दुर्धर आजाराने ग्रासलेले. तरीही या तुटपुंज्या कारकीर्दीत तिने आपली कायमची छाप रसिकांच्या मनावर उमटवली.
परिस्थितीने गांजलेले देहलवी कुटुंब मुंबईत आले ते रोजी-रोटीच्या शोधात. चरितार्थाचे साधन म्हणूनच अवघ्या नऊ वर्षांची मुमताज रजत पडद्यावर आली व गाजली.
१९४७मध्ये वयाच्या १४व्या वर्षीच ती राज कपूरची हिरॅाइन झाली. याच काळात तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री देविकाराणी पटेल यांनी तिचे नाव ‘मधुबाला’ असे ठेवले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेव्हापासून मधुबाला गाजतच राहिली. लोभस चेहरा, बोलके टपोरे डोळे, अस्सल देशी व्यक्तिमत्व यामुळे मधुबाला भारतीय सौंदर्याचे जणु प्रतीक बनली. एका बाजूला ट्रॅजिडी क्वीन मीना कुमारी तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीची नर्गिस असताना मधुबालाची आगेकूच चालूच राहिली.
‘महल’, ‘बेकसूर’, ‘तराना’ ‘मिस्टर ॲन्ड मिसेस ५५’ अशा चढत्या क्रमात मधुबालाचे चित्रपट गर्दी खेचत होते. हॅालिवूडचे प्रसिद्ध नियतकालिक ‘थिएटर आर्ट’ने १९५२मध्ये तिचा पूर्ण पान फोटो वापरून लेख प्रसिद्ध केला. त्याचे शीर्षक होते , ‘The Biggest Star of the World – and She is Not in Beverly Hills’.
१९५०च्या दशकाच्या उत्तरार्धात तिचे ‘काला पानी’, ‘बरसात की एक रात’ हे चित्रपटही गाजले. गांगुली भावंडांसमवेत तिने केलेली ‘चलती का नाम गाडी’ तिच्याही आयुष्याला वळणावर घेऊन गेली. या चित्रपटाचा नायक किशोर कुमार याच्या प्रेमात ती पडली व विवाहबद्ध झाली.
पण मधुबालाला खरी व चीरस्थायी ओळख दिली ती १९६०च्या के. आसिफ यांच्या मुघल-ए-आझम’ने. त्यातल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गीत व त्यांवर थिरकणारा तिचा पदन्यास व आदाकारी यांच रसिकमनांवरचे गारूड आज ६१ वर्षांनंतरही कायम आहे.
चित्रपट दिग्दर्शक होण्याचे तिचे स्वप्न मात्र अपुरेच राहिले. तिने ‘फर्ज और इष्क’ या चित्रपटाची जुळवाजुळव केली खरी पण तो सेटवर जाण्यापूर्वीच तिला आजाराने गाठले.
मधुबालाचा शेवटचा चित्रपट ‘ज्वाला’ १९७१ मध्ये प्रदर्शित झाला पण तिची ज्वाला मात्र त्यापूर्वीच २३ फेब्रुवारी १९६९ला निमाली होती.
दोन पिढ्यांची अनभिषिक्त व्हॅलेंटाईन कायमची निघून गेली होती.
तिला सलाम !
– भारतकुमार राऊत