यवतमाळ / अमरावती : कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आता अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी लॉकडाऊन जाहीर केला. अमरावती जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊन पाळला जाणार आहे. हा लॉकडाऊन शनिवारी सायंकाळी रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार असून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे.
संपूर्ण राज्यभरात एकीकडे कोरोना लसीकरण सुरु झालेले असताना दुसरीकडे मात्र काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव पुन्हा एकदा झालेला दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. दिवसाला प्रत्येकी १५०० नमुन्याची तपासणी केली जात आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे या संदर्भात डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा असे आदेश दिले आहे.
तसेच हाय -रिस्क, लो-रिस्कनुसार लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यवतमाळमध्ये सोशल डिस्टनसिंग न पाळणे, लग्न समारंभ मध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे, आधी नियम पायदळी तुडविल्याने हा आलेख वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र जमू नये. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसम्मेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका ई. करीता केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. तसंच मिरवणूक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे.