सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या मंगळवारी (ता.23) सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल उधळणार असल्याने याची उत्सुकता ग्रामीण भागात लागून राहिली आहे.
सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी संबंधी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत. 23 फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जाहीर केला आहे. यामुळे सहा तालुक्यातील अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरपंच पद आरक्षणावर आक्षेप घेतलेल्या आठ तालुक्यातील २२ हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान या तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवड कार्यक्रमाला स्थगिती दिली होती. स्थगिती मागे घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी आठ पैकी सहा तालुक्यात मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच निवड कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिलेत.
* या सहा तालुक्यात कार्यक्रम
माढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माळशिरस, करमाळा आणि उत्तर सोलापूर या सहा तालुक्यात मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच निवड कार्यक्रम होणार आहे. ३ दिवस अगोदर संबंधित गावांना तहसीलदारांनी नोटीस पाठवून २३ फेब्रुवारीला ग्रामपंचायतची पहिली सभा बोलवा. आणि त्याच दिवशी निवड कार्यक्रम राबवा, असे आदेशात म्हटले आहे. सरपंच पद आरक्षणाच्या हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांनी काय निर्णय दिला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात देखील याची माहिती नाही.
दरम्यान, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील हरकतींचे काय झाले? हरकती घेतलेल्या आठ तालुक्यात पंढरपूर आणि सांगोला तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन तालुका बाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.