सोलापूर/ मंगळवेढा : काल बुधवारी रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षे, ज्वारी, आंबा उत्पादक शेतकर्यांची झोप उडवली. हातातोंडाला आलेली द्राक्षे, ज्वारी पिक शेतकर्यांच्या हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अर्धा तास रिमझिम पाऊस झाल्यानंतर उघडीप घेतली. मात्र, रात्री पुन्हा दीड वाजता पाऊस आला. सुमारे तासभर हलका पाऊस झाला.
लॉकडाऊननंतर सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोलापूर शहर व परिसरात गुरुवारी पहाटेपासून वातावरणात मोठा बदल झालेला आहे. सोलापूर शहर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, काल बुधवारी रात्रीपासूनच शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. पंढरपुरात बुधवारी रात्री अचानक रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. या अवकाळी पावसाने द्राक्षांच्या बागीचे नुकसान होत असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये घाबरट निर्माण झाली आहे.
कालपासूनच शहर व तालुक्यात थंडी कमी झाली होती. तर बुधवारी दिवसभर उकाड्याचे वातावरण निर्माण झाले. परंतु रात्री उशीरा अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला. त्याचबरोबर रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. तसेच शहर व ग्रामीण भागातील लाईट गेली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वादळी वारा, विजेचा कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यामुळे द्राक्ष, डाळींब, ज्वारीसह रब्बी पिकाचे धोक्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, बोहाळी, कोर्टी, खर्डी, पटवर्धन कुरोली, सूस्ते आदी परिसरात द्राक्षांच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
* पांढरे सोने काळवंडले
मंगळवेढा तालुक्यात ज्वारीचे चांगले उत्पादन घेतले जाते. मंगळवेढ्याची ज्वारी महाराष्ट्रात प्रसिध्द असल्याने या ज्वारीला पांढरे सोने म्हटले जाते. दामाजी पंताची नगरी असलेल्या या मंगळवेढ्यातील ज्वारी पिकाला अवकाळी पावसाने झोडपल्याने पांढरी शुभ्र ज्वारी काळी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागात ज्वारी काढणीला वेगही आला आहे. काढणी केलेल्या व मोडणी केलेल्या ज्वारीचेही नुकसान झालेले आहे.
* द्राक्षांचे मणी तडकले
कासेगाव (ता.पंढरपूर) भागात हजारो हेक्टरवर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. येथील द्राक्षे देश -विदेशात निर्यात केल्या जातात. तर बेदाणा निर्मितीवरही भर दिला जातो. द्राक्षे उतरणीला आलेल्या असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षे घडावर (मण्यांवर) पाणी साचून राहिल्याने मणी तडकत आहेत. यामूळे द्राक्षांचे नुकसान होत आहे. कासेगाव बरोब अनवली, तनाळी, बोहाळी, रांझणी, त.शेटफळ, करकंब आदी भागातील द्राक्षे उत्पादक शेतकर्यांनी मात्र या अवकाळी पावसाचा धसकाच घेतला आहे.