पुणे : डिपी छान आहे, तुम्ही छान दिसता, अशा भावनिक कमेंट करुन अनेक महिलांची फसवणूक करणा-या सोलापुरातील व्यक्तीस पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सधन घरातील महिलांशी ओळख वाढवून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सोलापूर जिल्हातील योगेश पाटील ऊर्फ गणेश शिवाजी कारंडे यास अटक केलीय.
लोणी काळभोर पोलिसांनी करमाळा तालुक्यातील श्रीपूर येथून त्याला अटक केली आहे. गणेश कारंडे याच्या घरात सापडलेल्या दहाहून अधिक मोबाईल फोनची तपासणी करण्यात आली. त्यात मोबाईल फोनमध्ये अनेक सधन घरातील महिलांचे फोन नंबर, फोटो व काही व्हिडीओ क्लिप आढळून आल्या आहेत. यामुळे फक्त तोंडओळख असलेला कोणत्याही व्यक्तीबरोबर व्हॉटस्अप, फेसबुक या सारखा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
* सोलापुरातील शिक्षिकेची केली होती फसवणूक
योगेश पाटील उर्फ गणेश कारंडे या लंफग्याने २६ जानेवारीला सासवड-हडपसर रस्त्यावर सोलापूर जिल्ह्यातील शिक्षिकेला रस्त्यात सोडून, तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम व मोबाईल फोन असा ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. संबंधित शिक्षिकेला योगेश पाटील ऊर्फ गणेश कारंडे याचे खरे नाव, पत्ता अथवा व्यवसाय अथवा त्याच्या नातेवाईकांच्या बद्दल कसलीही माहिती नव्हती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केवळ सोशल मीडियामधील ओळखीवरून शिक्षिका या ठगाबरोबर जेजुरीला फिरण्यासाठी गेल्या होत्या. गणेश कारंडे याने शिक्षिकेकडील दागदागिने व रोख रक्कम घेऊन जातांना, त्यांना रस्त्यातच सोडून दिले होते.
* सोशलमिडियातून ओळख, मग अत्याचार फसवणूक
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर म्हणाले, ‘गणेश कारंडे याने संबंधित महिलेला फसवल्याची कबुली दिली आहे. गणेश कारंडे याच्या घराची झडती घेतल्यानंतर 10 हून अधिक मोबाईल फोन सापडले. त्यात मोबाईल कंपन्यांची 20 हून अधिक मोबाईल कार्ड मिळाली आहेत. गणेश कारंडे याच्याकडे आढळून आलेल्या मोबाईलमध्ये सोलापूर व पुणे जिल्ह्यातील अनेक महिलांचे मोबाईल नंबर व काही फोटोही आढळून आले आहेत. गणेश कारंडे हा सधन घरातील महिलांच्या बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तसेच लैंगिक अत्याचारानंतर कारंडे संबंधित महिलांचे दागदागिने, मोबाईल व महिलांच्याकडे असलेली रोख रक्कम घेऊन फरार होत होता. गणेश कारंडे याने अनेक महिलांना फसवले असण्याची शक्यता आहे.’ अशाप्रकारे कोणाची फसवणुक झाली असल्यास, संबधित महिलांनी तत्काळ लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.