कोल्हापूर : पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत आहे. त्यातच एका पेट्रोल पंपवर लावण्यात आलेली पाटी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार राहणार नाही : पेट्रोल पंप मालक संघटना’, असा फलक कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपवर लावण्यात आला आहे. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.
“पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार राहणार नाही,” असा मेसेज असलेली पाटी पुण्यातली नाहीतर कोल्हापुरातील आहे. इंधनाच्या दरवाढीनंतर कोल्हापुरातील एका पेट्रेल पंपावरील फलकावर हा अनोखा मेसेज लिहिण्यात आला आहे.
राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दरात सातत्याने वाढत आहेत. आता कोणत्याही क्षणी पेट्रोलचे दर प्रति लिटर शंभर रुपयांच्या दरात पोहोचण्याची चिन्हे आहेत. पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. साहजिकच महागाईवर त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आला आहे.
त्यातच पेट्रोल-डिझेलच्या या दरवाढीवरुन कोल्हापुरातील एका पेट्रोल पंप मालकाने ग्राहकांसाठी दिलेला सूचक इशारा सध्या सोशल मीडियातून चांगलाच चर्चेत आला आहे.”पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार राहणार नाही : पेट्रोल पंप मालक संघटना” असा वैधानिक इशारा देणारा हा मेसेज आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सांगली फाट्यावरील कोरगांवकर पेट्रोल पंप
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील पुलाची शिरोली येथील सांगली फाट्यावरील कोरगांवकर पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी हा सूचक इशारा देण्यात आला आहे. पेट्रोल पंपावरील हा मेसेज सोशल मीडियातून व्हायरल झाला असून पंप मालकांनीही याला दुजोरा दिला आहे.
व्हायरल होत असलेला प्रकार हा आमच्याच पेट्रोल पंपावरील आहे. मात्र पेट्रोल पंपावर नव्याने कामाला आलेल्या कर्मचाऱ्याने हा खोडसाळपणा केला आहे. संबधित कर्मचाऱ्याने केलेल्या प्रकाराशी आम्ही सहमत नाही असं मत पेट्रोल पंप मालकांनी म्हटलं आहे.