मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचे सर्व कुटुंबियांसोबत दर्शन घेतले होते. तसेच यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ चांगल्याच अक्रमक झाल्या आहेत. वाघ यांनी पीआयचा बाप शोधून काढण्याची भाषा वापरली आहे.
‘या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी असतानाही त्यांना सोडून देण्यात आले. वानवडी पोलीस काम करत नसून केवळ दिखावा करत आहेत. त्यामुळे वानवडी पोलिसांकडून तपास काढून घेऊन तो सक्षम पोलीस अधिकाऱ्याला द्यावा, अशी मागणी वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
दरम्यान, आज चित्रा वाघ यांनी आज प्रत्यक्ष घटना स्थळाला भेट देऊन संबंधित ठिकाणाची पाहणी केली पूजाला श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांनी पुण्याचे पीआय लगड यांची भेट घेतली यावेळी चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर वाघ यांनी दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणीदेखील वाघ यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी वाघ यांनी पुणे पोलीस दलाल असल्याचे वक्तव्य केले आहे. तर पी आय लगडचा बाप कोण आम्ही शोधून काढणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
* तक्रार नाही, गुन्हाही दाखल नाही
पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कुणीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळं आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, असं वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितलं. त्यामुळं चित्रा वाघ संतप्त झाल्या. एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि तक्रार आलेली नाही असं पोलीस म्हणतात. ते स्वत:हून दखल घेऊ शकत नाहीत का? कोणाच्या आदेशाची वाट बघत आहात? ह्यांना लाज वाटली पाहिजे. पोलीस हे महिलांचे रक्षक आहेत की भक्षक?,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला. संजय राठोड ह्या खुन्याला पोलीस वाचवताहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.
* पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून धूळफेक करण्याचं काम- चित्रा वाघ
बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान भाजपने या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यासह सरकारला धारेवर धरले आहे. भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, पोलीस या प्रकरणात धूळफेक करण्याचे काम करत आहेत. चौकशी झाल्याशिवाय आत्महत्या केल्याचे सत्य बाहेर पडणार नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.