मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ काल गुरुवारी एका स्कॉर्पिओत जिलेटिनचा साठा आढळून आला होता. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी अंबानी कुटुंबाला देण्यात आली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या गाडीच्या मूळ मालकाची माहिती समोर आली आहे.
मागील एका महिन्यापासून मुकेश अंबानी यांच्या घराची रेकी केली जात होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांना कारमध्ये एक बॅग सापडली आहे. त्यामध्ये एक चिठ्ठी देखील सापडली आहे. बॅगवर ‘मुंबई इंडियन्स’ असे लिहिले आहे. चिठ्ठीत लिहिले की, नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडवण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या.
या वाहनामध्ये काही बनावट नंबर प्लेट्सही आढळल्या आहे. यापैकी एक नंबर प्लेट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने रजिस्टर आहे. याप्रकरणी नागपूर कनेक्शन समोर आले आहे. स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या कांड्यावर नागपूरच्या कंपनीचे नाव आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मूळ मालकाची माहिती आली समोर
17 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन ठाण्यावरून संध्याकाळी आठच्या सुमारास मुंबईला येत होते. मात्र, विक्रोळी ऐरोली सिग्नल जंकशनजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर त्यांची स्कॉर्पिओ बंद पडली. त्यानंतर मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओ तिथेच रस्त्याच्या बाजूला उभी केली. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता हिरेन त्यांची गाडी घेण्यासाठी आले तेव्हा ती चोरीस गेली होती.
याबाबत हिरेन यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली होती. ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती तिथे सीसीटिव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्या रस्त्यावरील अन्य सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.
ही स्कॉर्पिओ मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील रस्त्यावर 24 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजता पार्क करण्यात आली होती. हीच स्कॉर्पिओ त्याच रात्री 12.40 वाजता हाजी अली जंक्शन जवळ असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले आहे. गाडी अँटिलिया बाहेर पार्क केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये म्हणून चालक गाडीच्या मागच्या दरवाजाने फरार झाला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथकं तैनात केली आहे. सध्या नऊ जणांची चौकशी देखील सुरु आहे.