मुंबई : युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का असा प्रश्न केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये इतकाच आमचा सल्ला आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार शरद पवार आणि युपीए विषयी एक भूमिका मांडली आहे. “शरद पवार यांनी युपीएचं अध्यक्षपद भूषवायला हवं” अशी मागणी त्यांनी केली. देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची ताकद पवारांमध्ये आहे असं आपलं मत त्यांनी व्यक्त केले आहे. मात्र महाविकासआघाडीत घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसला राऊतांची ही भूमिकी पटलेली नाही. मात्र, यावरून आता काँग्रेसकडून तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असा गोंधळ निर्माण झालेला आहे. बऱ्याचदा ते अशी आवई उठवतात आणि नंतर गोत्यात येत असतात. आत्ता त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. राज्यातल्या सरकारमुळे काँग्रेस नसून काँग्रेसमुळे हे सरकार बनलेलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचा वाद निर्माण करताना त्याचं भान त्यांनी ठेवणं आवश्यक आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
यानंतर आता शिवसेना युपीएचा घटक पक्ष नसल्याने राऊतांना युपीएबाबत बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल करत त्यांच्या विधानाला महत्व देण्याची गरज नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजव्यक्त केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.