पंढरपूर / सोलापूर : आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात घातली.
आषाढी एकादशी निमित्त आज मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरातील वीणेकरी केशव कोलते (वय 71) आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई केशव कोलते (वय 66) यांना ठाकरे दाम्पत्यासमवेत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलास आज गुलाबी रंगाचे सोवळे, शेला आणि मोती रंगाचा अंगरखा घालण्यात आला तर श्री रुक्मिणी मातेस गुलाबी रंगाची भरजरी रेशमी साडी नेसवण्यात आली. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे अर्थात राजस सुकुमाराचे आणि श्री रुक्मिणीमातेचे रूप अधिकच खुलून दिसत होते.
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होते. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या कोलते दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्मिणी मातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली. सत्काराप्रसंगी प्रारंभी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांत अधिकारी सचिन ढोले तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेली सुमारे तीस वर्षे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे एकाच प्रकारचे फोटो समितीकडून विक्रीसाठी उपलब्ध होत होते. अलीकडेच मंदिर समितीने श्री विठ्ठल- रुक्मिणीचे मनमोहक पोषाखातील आणि अलंकारातील वेगवेगळ्या आकारातील फोटो विक्रीसाठी तयार केले आहेत. त्या फोटोंचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरातील संत कान्होपात्रा मंदिराजवळील वृक्ष वठला होता.
तिथे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पुन्हा नव्याने रोपणही करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंदिरात आल्यानंतर फक्त विठ्ठल रुक्मिणी मूर्तीकडेच आपण पाहत असतो, परंतु मंदिरातील प्रत्येक खांब, प्रत्येक दगड काहीना काहीतरी बोलत असतो.
आज मी परंपरेचा वृक्ष लावला. त्यांची पायेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास व्यक्त केला.
कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षीपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील वीणेकरी लोकांमधून चिठ्ठी टाकून त्या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान दिला जातो. यावर्षी केशव कोलते (वय 71) हे गेल्या वीस वर्षांपासून मंदिरात वीणा वाजवून पहारा देण्याचे काम करत आहेत. ते मूळचे संत तुकाराम मठ, नवनाथ मंदिर पाठीमागे, वर्धा येथील रहिवासी आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली असून, मंदिरावर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
* सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रा प्रतिकात्मक साजरी
आषाढी यात्रेसाठी दरवर्षी सुमारे दहा लाखाहून अधिक वारकऱ्यांची गर्दी होत असते. यात्रेसाठी मोठ्या संख्येने वारकरी आल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन शासनाने सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकरी भक्तांच्या विना आषाढीचा सोहळा होत आहे.
ऐन यात्राकाळात पंढरपूर शहर आणि लगतच्या दहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात्रेत वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जाणारे रस्ते आज आषाढी एकादशी दिवशी निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. चंद्रभागेच्या काठावर लाखो वारकरी स्नानाची पर्वणी साधण्यासाठी दाटी करतात, ते चंद्रभागेचे वाळवंट देखील आज भाविकांच्या विना सुनेसुने आहे.
* मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून मंदिर व्यवस्थेची पाहणी
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर यांनी मंदिर परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.