कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दसरा चौकसह अनेक भागात पाणी जमा झाले आहे. कृष्णा नदीची पाणी पातळीही 50 फुटांपर्यंत गेली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा, कोयना आणि पंचगंगा या नद्यांनी पात्रं सोडली आहेत. त्यामुळे सांगली-कोल्हापुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. शहरातील काही भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर या भागात पाणी भरलं असून, हे पाणी आता हळूहळू दसरा चौकापर्यंत भरत आहे. तर यमगर्णीजवळ हायवेवर पाणी आल्याने पुणे-बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. कृष्णा, कोयना आणि पंचगंगा या नद्यांनी पात्रं सोडली आहेत. त्यामुळे सांगली-कोल्हापुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफची पथके मदतकार्य करत आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे. तसेच अडकलेल्या लोकांच्या जेवणाचीही सोय केली जात आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यात पुराचा धोका वाढला आहे. शहरातील मारुती चौकात रात्री पाणी जमा झाले होते.
* पुन्हा एकदा 2019 च्या महापुराचे सावट
मुसळधार पाऊस आणि कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाण्यानं धोका पातळी ओलांडल्यामुळे सांगली आणि कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 59.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात 154.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सांगलीकरांवर पुन्हा एकदा 2019 च्या महापुराचे सावट निर्माण झालं आहे.
* कोयना धरणात दोन दिवसात विक्रम
कोयना धरणात गेल्या दोन दिवसात 18 टीएमसी पाणी जमा झालंय. हा विक्रम आहे. साताऱ्यातील नवजा येथे 700 मिमी पाऊस पडला, महाबळेश्वराला देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय, म्हणून धरण आत्तापासूनच खाली करायला सुरू केलंय जेणेकरून भविष्यात पूर येऊ नये. कोयना धरणात यापू्र्वी 24 तासात 12 टीएमसी पाणी जमा होण्याचा रेकॉर्ड आहे. तो यावेळी मोडला गेलाय, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
पश्चिम महाराष्ट्रातील 2019 चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत, असं जयंत पाटील यांनी एका ठिकाणी माध्यमांशी बोलताना सांगितले.
* पोलीस प्रशासनाचे आवाहन
सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसतेय. 50 फुटांची धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर पाहण्यासाठी किंवा नदीचा प्रवाह पाहण्यासाठी सांगलीकर अनेक ठिकाणी गर्दी करतायत. सकाळी आयर्विन पुलावर काही हौशी सांगलीकर पोहण्यासाठी गर्दी करत होते. मात्र त्यांना सूचना देऊन हटवण्यात आलेले आहे. वारंवार सूचना देऊनही नियमांचं आणि सूचनांच उल्लंघन करणाऱ्या सांगलीकरांवर कठोर कायदेशीर कारवाई करू असं पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.
“कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती गंभीर आहे. पावसाने आता जरी थोडीफार विश्रांती घेतली असली तरीसुद्धा ज्या गावांना पुराचा धोका आहे तिथल्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावं. जनावरांसह स्थलांतरासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. सांगलीतल्या आयर्विन पुलाची पाणी पातळी सुद्धा वाढताना दिसत आहे. जवळपास 45 फुटांपर्यंत पाणी आलेलं आहे. तिथे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होऊन, प्रशासनाला सहकार्य करावं”
जयंत पाटील – जलसंपदा मंत्री