मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी हजेरी लावत पॉर्नोग्राफी प्रकरणात काल शुक्रवारी (ता. 23) कसून तपास केला आहे. तब्बल 6 तास पोलिसांनी शिल्पाची चौकशी केली. त्यानंतर तिचा जबाब नोंदवला. पॉर्न फिल्म निर्मीती प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रासमोरच शिल्पाला प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान राजच्या कंपनीत शिल्पा महत्त्वाच्या पदावर होती.
अश्लील चित्रपट प्रकरणात अटकेत असलेले उद्योगपती राज कुंद्रा यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी केली. शिल्पा शेट्टीच्या जुहू येथल्या घरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही चौकशी केली. गुन्हे शाखेचे अधिकारी शिल्पा शेट्टीचा जबाब घेतल्याची बातमी आहे. दरम्यान, राज कुंद्रा यांना 19 जुलैला अटक केल्यानंतर त्यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं असता 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.
गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला आणि यावेळी त्यांना त्यच्या घरात सर्व्हर आणि 90 व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राज याला याबाबत विचारले असता तो म्हणाले की, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेलेले नाही. राज कुंद्रावर केवळ या अश्लील सामग्री बनवल्याच नाही, तर लोकांना काम देण्याच्या बहाण्याने लोकांकडून अश्लील व्हिडीओ बनवून घेतल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी आर्थिक मदत करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले होते. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.
* प्लीज, माझा चित्रपट पाहा – शिल्पा शेट्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा हंगामा-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तिने हा चित्रपट पाहण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणात अटक झाली आहे. त्यामुळे शिल्पाच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियातून होत आहे. मात्र हंगामा 2 चित्रपट बनवताना अनेक लोकांचे प्रयत्न आणि मेहनत आहे, चित्रपटाचे नुकसान होऊ नये, असे शिल्पाने म्हटले आहे.
शिल्पाने तिच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. मी योगाचा अभ्यास करते आणि त्यातून मिळणाऱ्या शिक्षणावर माझा विश्वास आहे. “मी योगाचा अभ्यास करते आणि त्यातून मिळणाऱ्या तत्वज्ञानावर माझा विश्वास आहे. आयुष्य एकाच ठिकाणी अस्तित्वात असते आणि ते म्हणजे तुमच्या वर्तमानात. हंगामा २ या चित्रपटात संपूर्ण टीमची मेहनत आहे. हा चित्रपट चांगला बनवण्यासाठी प्रत्येक कलाकारने प्रचंड मेहनत घेतली आहे आणि कोणत्याही इतर गोष्टीचा या चित्रपटावर परिणाम व्हायला नको.