बंगळुरु : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री जयंती यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी कर्नाटकातील बंगळुरुमध्ये त्यांची ज्योत मालवली. त्यांनी प्रामुख्याने कन्नड, तमिळ आणि तेलुगु सिनेमात भूमिका केल्या. याशिवाय, मल्याळम, मराठी आणि हिंदी चित्रपटातही जयंती यांनी अभिनय केला आहे. जवळपास 500 चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
फक्त कन्नडच नाही तर इतर तमीळ, तेलगु, मल्याळम, मराठी आणि हिंदी
सहा भाषांमधील चित्रपटांमध्येही त्यांनी कसदार भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला. जयंती यांचा जन्म 6 जानेवरी 1945 रोजी कर्नाटकमध्ये झाला. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयक्षेत्रात काम सुरु केले. अभिनयाबरोबरच गायन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी काम केले होते. जयंती यांच्या निधनावर कन्नड चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. ‘जयंती यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान अमूल्य असल्याचे ट्वीट केले.
* 2018 मध्ये निधनाची अफवा
जयंती यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. तीन बहुरानियां, तुमसे अच्छा कौन है आणि गुंडा या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. 2018 मध्ये जयंती यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. तेव्हा त्यांनी चाहत्यांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले होते. 60 ते 80 च्या दशकात जयंती यांनी जेमिनी गणेशन, MGR आणि जयललिता या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले होते. जयंती यांना सात वेळा कर्नाटक राज्य फिल्म पुरस्कार आणि दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारने गौरविण्यात आले होते.