सोलापूर / उस्मानाबाद : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा सोलापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामाने आता गती घेतली आहे. ३० गावांतील साधारण- दीड ते दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातून रेल्वे धावणार असून, ट्रॕकसाठी लागणारी जमीन भूसंपादनासंदर्भातील अंतिम अहवाल रेल्वे प्रशासनाने सोलापूर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सोलापूर ते उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर मागील वर्षी या मार्गाच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती. या एजन्सीने संपूर्णपणे काम करून किती शेतकऱ्यांची किती जमीन जाणार यासंदर्भातील सातबारा उतारा यासह अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथील भूसंपादन कार्यालय व उस्मानाबाद येथील भूसंपादन कार्यालयास सादर केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* लवकरच होणार मोजणी
भूसंपादन अहवाल सादर केल्यानंतर भूसंपादन अधिकारी यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या मार्गात जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा यासह अहवाल भूसंपादन विभागाला सादर करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
* या गावांमधील जमीन भूसंपादन होणार
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील बाळे, केगांव, भोगांव, गुळवंची, कारंबा, बाणेगांव, मार्डी, सेवालालनगर, होनसळ, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगांव काटी, तामलवाडी, गंजेवाडी, सूरतगांव, सांगवी काटी, गोंधळवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, सारोळा, रायखेल, हंगरगा, मंगरूळपाटी, तुळजापूर, तडवळा, बोरी, बावी, वडगांव, पळसवाडी, देवळाली, शेखापूर, उस्मानाबाद, सांजाव जहाँगीरदारवाडीपर्यंत हा मार्ग असणार आहे.