सोलापूर : स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळे उघड्या डीपीच्या विजेचा शॉक लागून पाच वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. पूर्वा सागर अलकुंटे (वय५ वर्षे रा.385 उत्तर कसबा) असं विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.
पांजरापोळ ते बाळीवेस दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे. वडार गल्लीजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या डीपीमुळे पूर्वाला विजेचा शॉक बसला. दरम्यान या ठिकाणी नागरिकांनी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पूर्वाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
यावेळी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा महापालिका विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनी स्मार्ट सिटीच्या गलथान कारभार या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली. संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सोलापूर शासकीय रुग्णालयात पूर्वाच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे. पुढील तपास फौजदार चावडी पोलिस करीत आहेत.
* कांद्याच्या रक्कमेवरून लाथाबुक्क्यांनी मारहाण ; चौघांवर गुन्हा
कांदा व्यापाऱ्याकडून कांदा खरेदी केल्यानंतर त्याची देणे रक्कमेवरून लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. ही घटना २७ जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ताज रोडलाईन्स हैदराबाद रोड सोलापूर येथे घडली. याप्रकरणी फिरोज शमशोदिन मुजावर (वय-२७,रा. संगम नगर, मुळेगाव रोड,सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अमन कल्याणी, इम्तियाज कल्याणी, उजेब कल्याणी, नोमान कल्याणी (सर्व रा.रोडलाईन्स हैदराबाद रोड,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी फिरोज मुजावर यांच्या ओळखीचे मित्र अहमदनगर येथील कांदा व्यापारी इब्राहिम इनामदार यांच्याकडून कांदे खरेदी केले होते.त्याची देणे असलेली रक्कम दिली नाही, याबाबत फिर्यादीच्या मित्राने फिर्यादीस विचारणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी व फिर्यादीचा मित्र असे बरेच वेळा इम्तियाज कल्याणी यांच्याकडे विचारणा केली. नंतर मात्र २७ जुलै रोजी संशयित आरोपी अमन कल्याणी याने फिर्यादीस फोन करून इनामदार याचे देणे असलेल्या रकमेबाबत बोलू असे सांगून बोलावून घेतले.
त्यावेळी फिर्यादी यांनी इम्तियाज कल्याणी याला इनामदार यांचे देणे असलेल्या पैसा बाबत विचारणा केली असता, इम्तियाज याने तुम्ही कोण आम्हाला विचारणारे असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर या संशयित आरोपींनी मिळून फिर्यादी व फिर्यादीचा मित्र यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान कल्याणी याने तेथे पडलेली लाकडी काठी हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, याचा पुढील तपास पोलीस नाईक मुजावर करीत आहेत.