कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील नृसिंहवाडी येथे भेट दिली आहे. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, आम्ही ती मागणी मंजूर करु असं आश्वासन दिलं. अन्यथा दरवेळी पाऊस येणार आणि आम्ही तुम्हाला भेटत राहणार असंच सुरु राहील, असं त्यांनी म्हटलं. तसंच अद्यापही कोरोनाचं संकट गेले नाही, त्यामुळे मास्क लावायला विसरू नका, असंही त्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. ते तिथे पोहोचले असून पूरग्रस्त भागात नुकसानीची पाहणी करत आहेत. त्यांनी कोल्हापुरातील नृसिंहवाडी आणि शिरोळ येथे भेट दिली आहे. त्यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान याआधी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. मुख्यमंत्री ठाकरे पूर्ण पाहणीनंतर दुपारी दोन, अडीचवाजता पत्रकार परिषद घेऊन मदत जाहीर करण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात महापुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही समोरासमोर आले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोल्हापूरकरांना आश्चर्य वाटले.
राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध भागांचे दौरे करत आहेत. आज शुक्रवारी ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांनी पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली. दरम्यान शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान, हे दोन्ही दिग्गज आमने-सामने आल्याची घटना घडली. यावेळी प्रचंड गर्दी झाल्याचेही दिसून आले. कोल्हापुरातील शाहुवाडी चौकात हे आजीमाजी मुख्यमंत्री समोरासमोर आले होते.
देवेंद्र फडणवीसांवर चिखलीकरांनी संताप व्यक्त केला. फडणवीसांच्या काळातील पूरावेळी मदतीची घोषणा झाली. पण त्यावेळचीच मदत मिळाली नसल्याने चिखलीकरांनी देवेंद्र फडणवीसांवर संताप व्यक्त करत नाराजी बोलून दाखवली.
यावेळी, तातडीची मदत दिलीच पाहिजे पण एक कायमस्वरुपी मार्ग काढला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर, यावेळी शिवसैनिकांकडून ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथे दौरा केल्यानंतर कोल्हापूर शहरात दुपारू बारा वाजता दाखल झाले तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही याचवेळी या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मुख्यमत्री ठाकरे याना विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.