पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेला पंढरीचा विठूराया हा गोर गरिब, कष्टकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. अनेक भाविक दर्शनासाठी शेकडो मैल पायी येतात आणि सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन होतात. याच विठूरायाच्या गरिब भक्तांमध्ये एक मोठा दानशूर भेटला. वाचा काय झाले विस्तृतमध्ये.
मुंबई येथील या भक्ताने नाव न सांगण्याच्या अटीवर मंदिरातील दान पेटीत तब्बल एक कोटी रुपये दान केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दीड वर्षपासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. असे असले तरी विठुरायाच्या भक्ती कमी झालेली नाही. कोरोनामुळे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या विठूरायचं मंदिर बंद आहे. यामुळे भाविक दर्शनासाठी येत नाहीत. त्यामुळे देणगीचा प्रश्नच येत नाही. परिणामी म्हणून मंदिराला येणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे .अशातच एका भाविकाने आपल्या लाडक्या विठूरायाच्या चरणी तब्बल एक कोटीची देणगी दिली. ही देणगी दिल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
कोरोना सुरू झाल्यापासून सलग सहा यात्रा भरल्या नाहीत. केवळ परंपरा जपण्यासाठी मानाच्या पालखी सोहळ्याना परवानगी दिली व यात्रा मर्यादित स्वरूपात साजऱ्या केल्या. त्यामुळे देणगीवर मोठा परिणाम झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“मुंबई भागात राहणाऱ्या एका विठ्ठल भक्ताने ही देणगी दिली आहे. मंदिर समितीच्या इतिहासामध्ये प्रथमच एका भाविकाकडून एक कोटीचे दान मिळाले. मुंबईतील एका विठ्ठल भक्ताचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर या भाविकाला एका इन्शुरन्स कंपनीकडून काही पैसे मिळाले ते आलेले सर्व पैसे या भक्ताच्या कुटुंबीयांनी विठ्ठलाच्या दान पेटीत अर्पण केले. इतकी मोठी रक्कम दान देऊन ही या भाविकांने आपले नाव मात्र गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर समितीला केली आहे.
नवऱ्याची शेवटची इच्छा होती म्हणून पत्नीने एक कोटी रुपयांची रोख रक्कम श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली. सदर महिला भक्तही मुंबईमध्ये राहते. नुकतेच तिच्या पतीचे कोरोनाने निधन झाले आहे. मृत्यूपूर्वी सदर महिलेच्या पतीने श्री विठ्ठल मंदिराला देणगी देण्याबाबत शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्याची पूर्तता पतीच्या पश्चात पत्नीने पूर्ण केली. धक्कादायक बाब म्हणजे हे कुटुंब मध्यमवर्गीय आहे. यांच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे.
मात्र पतीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी सदर आज्ञाधारक पत्नीने विम्याची आलेली सर्व रक्कम मंदिराला देणगी म्हणून सुपूर्त केली. स्वतःची आणि बाळाच्या भविष्याची चिंता श्री विठ्ठलाच्या भरवश्यावर सोडत आपण हा निर्णय घेतल्याचे त्या महिलेने सांगितले.”