नाशिक : शिक्षणसंस्थेकडून आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) ताब्यात घेतलेल्या व चौकशीनंतर घरी परतलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर फरार झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. न्यायालयात हजर राहण्याचा आदेश त्यांनी धुडकावला आहे.
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांची लाच शासकीय वाहन चालकाच्या माध्यमातून स्वीकारल्याच्या कारणातून शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील महिला अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत मोठी चर्चा झाली. झनकर यांच्यासह या प्रकरणात वाहन चालकासह एक प्राथमिक शिक्षक याचा देखील सहभाग आहे.
तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले होते. या मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे संस्थेस नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी संस्थेकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. यावेळी संस्थेकडे सुमारे ९ लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. यावेळी तक्रारदार यांनी तडजोडीअंती आठ लाख रुपये देण्याचे कबूल केले. काल मंगळवारी (ता.१०) सायंकाळी साडेपाचला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर वीर यांच्या शासकीय वाहनावरील चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले याने तक्रारदार यांच्याकडून सदरची रक्कम स्वीकारली.
याचवेळी चालक येवले यास पथकाने रंगेहात पकडल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांचे नाव घेतले. त्यानंतर पथकाने तत्काळ त्यांच्या थेट झनकर यांच्या दालनात जात त्यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात वीर यांच्यासह वाहन चालक ज्ञानेश्वर येवले, प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते (राजेवाडी, ता. नाशिक) यांच्याविरूद्धही कारवाई केली. यानंतर पथक रात्री उशिरापर्यंत पथकाकडून झनकर यांची चौकशी सुरु होती. संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिराने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते या दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या दोघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना निलंबित करण्यात आल्यानंतर डॉ. वैशाली झनकर-वीर यांची सर्वप्रथम जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांची माध्यमिक शिक्षाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्या शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहत होत्या.