काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने नियंत्रण मिळवले आहे. तर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला आहे. रक्तपात होऊ नये, यासाठी माझे देश सोडणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया घनी यांनी फेसबुकवर दिली आहे. जर आताही अफगाणिस्तानमध्ये रक्तपात झाला तर मोठे मानवी संकट निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. तर घनी यांनी अफगाणिस्तानला धोका दिला, असा आरोप अफगाणचे माजी राष्ट्रपती जमील करजई यांनी केला आहे.
अतिरेकी गटाला रोखण्यासाठी अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परत गेल्यानंतर सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तालिबानने काल रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं. अशरफ घनी ताजिकिस्तानला रवाना झाले होते. मात्र त्यांचे विमान तेथे उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अशरफ घनी आता अमेरिकेत जाऊ शकतात. सध्या ते ओमान येथे आहेत. मात्र त्यांच्या अफगाणिस्तान सोडण्यानंतर आता हे महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तानातून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी रोख रकमेने भरलेल्या चार कार आणि हेलिकॉप्टरसह काबूलला रवाना झाले होते. एका वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. रशियन वृत्तसंस्था आरआयए आणि काही प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत म्हटले आहे की, अशरफ घनी यांना सर्व पैसे सोबत घेऊ जाता आले नाहीत म्हणून त्यांना काही पैसे मागे ठेवावे लागले.
काबुलमधील रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इंश्चेन्को यांनी सांगितले की, चार कार रोख रकमेने भरलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काही रक्कम हेलिकॉप्टरमध्ये ठेवली. यानंतरही, ते सर्व पैसे ठेवू शकले नाहीत आणि काही पैसे असेच सोडले. रशियन दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रत्यक्षदर्शीकडून ही माहिती मिळाली.
सध्या अशफ घनी हे ओमानला असल्याचा दावा केला जात आहे. त्यांना ताजिकिस्तान आणि कझाकिस्तानने त्यांच्या देशात येऊ दिले नाही. ते ओमानमार्गे अमेरिकेला जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तान सोडण्याआधीच अशरफ घनी यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये ते देशातील रक्तपात थांबवण्यासाठी देश सोडून जात असल्याचे म्हटले होते. जर मी इथे राहिलो तर माझे समर्थकही रस्त्यावर उतरतील आणि तालिबानच्या हिंसक वृत्तीमुळे रक्तपात होईल, असे घनी यांनी म्हटले होते.