नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तालिबानने धक्कादायक निर्णय घेतला आहे. तालिबानने भारतासोबतच आयात-निर्यातीचा व्यापार थांबवला आहे. पाकिस्तानमार्गे होणारी मालवाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी भारतात अफगाणिस्तानमधून माल येणे बंद झाले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेश महासंचालक अजय सहाय यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान भारताने अफगाणिस्तानमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
भारत अफगाणिस्तानमध्ये साखर, औषधे, चहा, कॉफी, मसाले आणि कापड अशा गोष्टींची निर्यात करतो. तर अफगाणिस्तानमधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने सुकामेव्याचा समावेश आहे. भारतात होणाऱ्या सुकामेव्याच्या एकूण आयातीपैकी 85 टक्के हिस्सा अफगाणिस्तानमधून आयात केला जातो. ही गोष्ट लक्षात घेऊन तालिबानी शासकांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आयात-निर्यात सुरु ठेवली पाहिजे, असे मत भारतीय निर्यात संघटनेचे संचालक अजय सहाय यांनी व्यक्त केले.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. भारत तालिबानसंदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची, या संभ्रमात आहे. मात्र तालिबानने भारताविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता अफगाणिस्तानात भारताला व्यापारी आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तालिबानने व्यापारी मालाची वाहतूक बंद केली आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची ये-जा होत असे. मात्र, आता तालिबान्यांनी हाच मार्ग रोखून धरल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष राहील, असे अजय सहाय यांनी सांगितले.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 2021 मध्ये आतापर्यंत चांगला व्यापार झाला आहे. या कालावधीत भारताने अफगाणिस्तानात 835 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर अफगाणिस्तानमधून 510 कोटी डॉलर्स मुल्याच्या वस्तू आयात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, अफगाणिस्तानमध्ये भारताने तब्बल 400 प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीचा हा आकडा तब्बल 22 हजार कोटी रुपयांच्या घरात जातो.
* केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रतिक्रिया
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यंत चांगले व्यापारी संबंध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अफगाणिस्तानमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, आता तालिबानच्या सत्तेनंतर ही सर्व समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याविषयी विचारले असता त्यांनीही इतक्यात याबाबत बोलणे घाईचे ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली.