मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त विविध वृत्त वाहिन्यांनी दिले आहे. त्यानंतर गोळवली, संगमेश्वर येथे डॉक्टर आल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय पथक येथे पोहोचले आहे. राणे यांचा बीपी वाढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिक पोलिसांकडून अटक करण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर पोलिस येथे पोहोचले. पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. राणेंच्या गाडीतील चालकाला उठवून पोलिसास बसवून राणेंना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज मुंबईत शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांनी जुहू परिसरातील नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दगडफेक झाली. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यात काही कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. तर एका पोलिसालाही दुखापत झाली आहे.दरम्यान कोकणात नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाली असून चिपळून, कोकणात तणावाची परिस्थिती आहे.
नारायण राणे यांनी केलेले विधान गंभीर असून त्यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक चिपळूनला रवाना झाले आहे. दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.