सोलापूर : राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पै. आप्पालाल शेख यांचे आज गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
1992 साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे, ज्यांचा सन्मान शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन केला त्या आप्पालाल शेख यांचे अल्पशा आजारपणामुळे दुःखद निधन झाले. भल्या भल्या पैलवानांना आस्मान दाखवणारे आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते.
पैलवान आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते. त्यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील पैलवान होते. इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठलं. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आप्पालाल देखील कोल्हापूरला गेले. तिथे त्यांना देखील कुस्तीची आवड निर्माण झाली.
1980 साली आप्पालाल यांचे बंधू इ्स्माईल यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. भावाचा वारसा पुढे नेत पुढे 1992 साली आप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र 1991 साली न्युझिलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक देखील पटकावलं.
आप्पालाल यांचे पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील 2002 साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. एकाच परिवारात तीन-तीन महाराष्ट्र केसरी आहेत. सोलापूरच्या बोरामणी गावाने अनेक पैलवान घडवले आहेत.
जवळपास 10 महिन्यांपूर्वी आप्पालाल शेख यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. समाजातील दानशूर लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला होता. ज्यानी कुस्तीसाठी सर्व काही लावलं आज त्यांची तीनही पोरं कुस्तीच्या फडात आपलं नशीब आजमावत आहेत. वडीलांचा ऑलम्पिक पदक मिळवण्याचा अपुरं राहिलेलं स्वप्न पुर्ण करण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया आप्पालाल यांचा मुलगा गौसपाक यांने दिली. गौसपाक सोबत अशपाक आणि अस्लम हे दोघे कुस्तीचा सराव करतात.