सोलापूर : सध्या प्रशासकाच्या आधिपत्याखाली असलेली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकार निर्णय अत्यंत चुकीचा आहे. सोलापूरच्या बँकेवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासक आहे, ही बँक सुस्थितीत आहे. केवळ पराभवाच्या भीतीने सरकारने या बँकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, असा आरोप माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केला आहे.
राज्य सरकारने नाशिक, नागपूर बुलढाणा आणि सोलापूर या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यातील नागपूर आणि बुलढाणा या बँका डबघाईस आलेल्या आहेत. नाशिकच्या बँकेवर नुकतेच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अनेक दिवसांपासून प्रशासकाची नियुक्ती आहे. या बँकेची परिस्थिती सुधारलेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे.
महाविकास आघाडी सरकारने पराभवाच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली आहे. सोलापूर जिल्ह्यात पूर्णपणे भाजपचे वर्चस्व आहे. भाजपच्या ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही, अशी भीती महाविकासआघाडी सरकारपुढे आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक भाजपच्या ताब्यात जाईल आणि महाविकास आघाडीची फजिती होईल, यामुळेच सरकारने या बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा बँकेवर प्रशासक आल्यापासून या बँकेची परिस्थिती सुधारलेली आहे. तरी लवकरात लवकर या बँकेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.