सोलापूर : हज यात्रा कमी पैशात करतो असे म्हणून एका वृद्धाची 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना 1 जून 2021 ते 27 ऑगस्ट 2021 दरम्यान घडली. याप्रकरणी महंमद सादिक महिबूबसाब बेपारी (वय- 75 ,रा. रविवार पेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुजतअली अ.करीम शेख,फिरदोस सुजातअली शेख,शहावेज सुजातअली शेख (सर्व. रा.सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,या संशयित आरोपींनी मिळून संगनमत करून फिर्यादी बेपारी यांचा अशिक्षित व वयस्कर पणाचा फायदा घेऊन हज/ उमराह यात्रा कमी पैशात करतो, असे म्हणून विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर फिर्यादी कडून यात्रेकरिता 60 हजार रुपये रोख घेऊन त्याबदल्यात यात्रेला न पाठविता फिर्यादीचा विश्वासघात करून पैसे परत न देता फसवणूक केली.
फिर्यादी बेपारी यांनी या आरोपींना पैसे मागण्याकरिता गेले असता आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राऊत हे करीत आहेत.
* थोबडे मळ्यात दोन घर फोडून चोरी
सोलापूर – जुना देगांव नाका थोबडे मळा परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून 62 हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवार दि. 27 ऑगस्ट रोजी घडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मल्लिकार्जुन सिध्दप्पा ढाळगे (वय 49, रा. 289, थोबडेवस्ती जुना देगांव नाका सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी की, यांच्या बंद घराचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला आणि घरातील एलईडी टिव्ही, रोकड 10 हजार रूपये आणि सात तोळे चांदीचे पैंजण असा 26 हजार 100 रूपयाचा ऐवज तर शेजारी राहणाऱ्या रणजित संजय कोकोटे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील सोन्याच्या अंगठ्या, 10 हजार रूपये असे 36 हजार रूपये या दोन्ही घरातून चोरट्याने जवळपास 62 हजार 100 रूपयाचा ऐवज चोरून नेला असल्याची नोंद सलगरवस्ती पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार रूपनर करीत आहेत.
* मोबाईल दुकानात चोरी
सोलापूर – जुना विडी घरकुल परिसरातील सोना चांदी अपार्टमेंट मधील मोबाईल दुकान अज्ञात चोरट्याने फोडून दुकानातील 14 हजार 800 रूपयाचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवार दि. 27 ऑगस्ट रोजी झाली.
सतीश चिदानंद कांबळे (वय 40, रा. एच ग्रुप जुना विडी घरकुल सोलापूर) यांचे सोना चांदी अपार्टमेंट मध्ये लक्ष्मी मोबाईल सर्व्हिस नावाचे मोबाईल दुरूस्ती आणि विक्रीचे दुकान असून अज्ञात चोरट्याने या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपन्याचे 20 ब्लूट्यूथ हेडफोन, 20 नग पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, 4 आय टेल कंपनीचे मोबाईल असा एकूण 14 हजार 800 रूपयाचा ऐवज चोरून नेला. याबाबत एमआडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस नाईक गंगावणे करीत आहेत.